मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:39+5:302021-08-28T04:33:39+5:30
जालना : कधी बालकांच्या हट्टासाठी तर कधी पालक प्रेमापोटी चॉकलेटसह इतर गोड पदार्थ मुलांना खाण्यासाठी देतात. परंतु, हे चॉकलेट ...

मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळाच !
जालना : कधी बालकांच्या हट्टासाठी तर कधी पालक प्रेमापोटी चॉकलेटसह इतर गोड पदार्थ मुलांना खाण्यासाठी देतात. परंतु, हे चॉकलेट आणि इतर अतिगोड पदार्थ मुलांच्या दातांना कीड लागण्यास कारणीभूत ठरत आहेत. दातांना कीड लागू नये, यासाठी लहान मुलांनी चॉकलेट खाणे टाळणे गरजेचे आहे.
पूर्वी वाढदिवस किंवा विविध सणाला लहान मुलांना गोड पदार्थ खाण्यास मिळत होते. परंतु, आज राजरोसपणे मुलांना चॉकलेट खाण्यासाठी दिले जाते. परंतु योग्य काळजी न घेतल्यास हे चॉकलेट, गोड पदार्थ मुलांच्या दातांना कीड लागण्यास कारणीभूत ठरू शकते. दात किडल्यानंतर येणाऱ्या नव्या दातांवरही त्याचा परिणाम होतो. शिवाय मुलांना जेवण करताना, पाणी पिताना त्रासही हाेऊ शकतो. त्यामुळे मुले १२ वर्षांची होईपर्यंत त्यांच्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.
अतिगोड पदार्थ न खाल्लेलेच बरे !
चॉकलेट खाल्ल्यानंतर मुले दात घासत नाहीत किंवा गुळण्या करीत नाहीत. त्यामुळे दातांमध्ये चॉकलेट अडकून राहते.
दातांमध्ये अडकलेल्या चॉकलेटवर तोंडातील जंतू प्रक्रिया करतात आणि नंतर दात किडण्यास सुरूवात होते. दात किडल्यानंतर मुलांना खूपच त्रास होतो.
त्यामुळे दात किडू नयेत यासाठी चॉकलेटसह इतर अतिगोड पदार्थांपासून लहान मुलांनी दूर राहिलेले केव्हाही चांगलेच आहे.
अशी घ्या दातांची काळजी
मुलांनी चॉकलेटसह अतिगोड पदार्थ खाल्ल्यानंतर गुळण्या कराव्यात. दिवसात दाेन वेळेस दात घासावेत.
दातांचे आजार असतील तर घरगुती उपाय न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत.
दंतरोग तज्ज्ञ म्हणतात...
लहान मुलं चॉकलेटसह अतिगोड पदार्थ खातात. शिवाय ब्रशही व्यवस्थित करीत नाहीत. त्यामुळे दात किडण्याच्या तक्रारी वाढत आहेत. मुलांचे दात किडण्यासह इतर काही त्रास असतील तर घरगुती उपचार न करता तज्ज्ञामार्फत उपचार घ्यावेत.- डॉ. रूपाली शेळके
लहान मुलांना चॉकलेटसह इतर गोड आणि चिकटणाऱ्या पदार्थांपासून दूर ठेवावे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरावी. पालकांनी दिवसातून एकदा मुलांचे दात घासावेत. मुलांना दातांची काळजी घेण्याची चांगली सवय लावावी. - डॉ. प्रशांत पळणीटकर