कुंभार पिंपळगाव / तीर्थपुरी : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मागील २४ तासांत मंगुजळगाव, बोंधलापुरी आणि घनसावंगी शहरात खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी तालुक्यात बंदोबस्त वाढवला असून, घटनांच्या तपासासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत.
जुन्या जागेच्या वादातून तरुणाचा खूनघनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथे रविवारी सकाळी जुन्या जागेच्या वादातून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली. माजी सरपंच आत्माराम मोरे यांच्यासह पाचजणांनी लोखंडी रॉड व चाकूने भररस्त्यात मारहाण करत संभाजी मधुकर उंडे (वय २७) याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास संभाजी उंडे वडिलांसोबत आईला दवाखान्यात घेऊन अंबडला जात होते. यावेळी माजी सरपंच आत्माराम मोरे याने संभाजी उंडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली. त्याचवेळी सचिन मोरे, सुशील मोरे, विशाल मोरे आणि अक्षय मोरे या चार आरोपींनीदेखील धारदार शस्त्रांनी संभाजीच्या पोटावर, डोक्यावर आणि पायावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत उंडे यांना घनसावंगी येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगुजळगाव येथे विवाहितेचा पतीकडून खूनघनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव येथे शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडवली. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलन कांता गुढेकर (वय ३१) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात वसंत बाबूराव सुतार (वय ३२, व्यवसाय शेती, रा. पारडगाव, ता. घनसावंगी) यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी पती कांता दगडू गुढेकर घटनेनंतर फरार झाला होता. मात्र पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच पथकाने तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. सध्या आरोपीकडून सखोल चौकशी सुरू आहे.
घनसावंगी शहरात प्लॉटच्या वादातून खूनतिसरी खुनाची घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी घनसावंगी शहरातील सूतगिरणीजवळ घडली. अडीच गुंठ्याच्या प्लॉटच्या वादातून श्रीरंग पडळकर (रा. घनसावंगी) यांचा गाडीने उडवून खून करण्यात आला. मयत श्रीरंग पडळकर व आरोपी हेदर पठाण यांच्यात अडीच गुंठे प्लॉटच्या मालकीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. जमिनीच्या ताब्याबाबत वाद अधिक चिघळल्याने आरोपी हेदर पठाण याने रागाच्या भरात श्रीरंग यांना गाडीने जोरदार धडक दिली. यामुळे श्रीरंग पडळकर यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्वनियोजित असून, जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर पाच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. यातील एका आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.