Jalna Municipal Corporation Election 2026 : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर प्रचार सभा पार पडली. या सभेला आमदार बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात पोलादनगरी आणि बियाण्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरात तब्बल 90 वर्षांनंतर महानगरपालिका स्थापन झाली आहे. या ऐतिहासिक निवडणुकीच्या पहिल्या जाहीर सभेत सहभागी होण्याचा मला आनंद आहे.
शहरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे समस्या वाढल्या
देशात अनेक दशके भारत खेड्यांमध्ये राहतो ही संकल्पना मांडली गेली. मात्र, राज्यकर्ते हे विसरले की, भारत शहरांमध्येही राहतो. रोजगार, शिक्षण, अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठी लोक शहरांकडे आले; पण त्यांच्या मूलभूत सोयींची योग्य व्यवस्था झाली नाही. यामुळे झोपडपट्ट्या वाढल्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, सांडपाणी नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये जाऊ लागले आणि शहरांची अवस्था बकाल झाली.
2014 नंतर शहरांसाठी योजनांचा वेग
2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर शहरांच्या विकासावर भर देण्यात आला. देशाच्या सुमारे 65 टक्के जीडीपी शहरांमधून तयार होत असल्याने, शहरांचा विकास आवश्यक आहे, असे सांगत स्मार्ट सिटी, अमृत योजना यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आल्या. जालन्याला मिळालेला निधीही या केंद्र सरकारच्या योजनांमुळेच मिळाला असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध झाली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
झोपडपट्टीतील बेघरांना जमीनपट्टा आणि घर
झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबांकडे कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना घरांचा लाभ मिळत नव्हता. यावर सरकारने दोन महिन्यांपूर्वी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता प्रत्येक बेघर व्यक्तीला जमीनपट्टा दिला जाईल आणि घरासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पाणीपुरवठा आणि वीज प्रकल्पांवर भर
जालन्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हा प्रश्न सोडवण्यासाठी 474 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत 75 कोटी रुपयांची कामे पूर्ण होतील. जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू. प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, उर्जा मंत्री असताना वीजबिलापासून मुक्तीसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 100 कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधा
जालना हे स्टील आणि पोलाद निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे ड्राय पोर्ट आणि समृद्धी महामार्गाची उभारणी करण्यात आली. संभाजीनगर आणि जालना हे भविष्यात इंडस्ट्रीचे मॅग्नेट ठरणार आहेत, असे मी मागे बोललो होतो, हे आज प्रत्यक्षात उतरले असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आमच्या सरकारने शहरासाठी 100 कोटी रुपयांचा रिंग रोड, 175 कोटी रुपयांचे रेल्वे स्थानक विकासकाम, जालना मेडिकल कॉलेज, अंतर्गत रस्ते विकास, जालना-खामगाव रेल्वे मार्ग..अशा विविध योजना राबवल्या तसेच, भविष्यात जालन्यात 100 टक्के भुयारी गटार योजना राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही
भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. हे सरकार शहरांचे रूप बदलणारे सरकार आहे, असे म्हणत फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ही योजना बंद होणार, अशी विरोधकांकडून अफवा पसरवली जात होती. पण, आज मी सांगू इच्छितो, जोपर्यंत हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही. महापौर भाजपचा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Web Summary : Devendra Fadnavis, at a Jalna rally, highlighted infrastructure development, housing schemes, and assured continued funding for the 'Ladki Bahin' scheme, promising further progress under BJP leadership.
Web Summary : जालना में एक रैली में देवेंद्र फडणवीस ने बुनियादी ढांचे के विकास, आवास योजनाओं पर प्रकाश डाला और 'लाड़की बहिन' योजना के लिए धन जारी रखने का आश्वासन दिया, भाजपा नेतृत्व में आगे प्रगति का वादा किया।