जालना बाजार समालोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:09+5:302021-01-13T05:21:09+5:30
जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, ...

जालना बाजार समालोचन
जालना : संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून गहू, शेंगदाणा, वनस्पती तुपाच्या दरात तेजी आली आहे. बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, गूळ, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आदी वस्तूंच्या दरात मात्र मंदी आली.
अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे पोल्ट्री फार्मला लागणाऱ्या बाजरी व मक्याची मागणी सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घटली. परिणामी, व्यापारी हवालदिल झाले. बाजरी व मक्याच्या दरात सध्या क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची मंदी आली आहे. बाजरीची आवक दररोज ७०० पोते इतकी असून, भाव १०६० ते १५०० रुपये प्रति क्विंटल आणि मक्याची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, भाव ११२५ ते १२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नवीन मका येण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रवगळता इतर सर्व राज्यांमध्ये मक्यांचा साठा अत्यल्प आहे. त्यामुळे भविष्यात मक्याच्या दरामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
नाफेडच्या वतीने तुरीचे टेंडर नुकतेच जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दराचे टेंडर (५६१६ रुपये) जालना बाजारपेठेतील व्यापाऱ्याचे असल्याचे बोलले जाते. सध्या तुरीची आवक दररोज ८ हजार पोती इतकी असून, भाव स्थिर म्हणजे ५२०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
सोयाबीनची आवक दररोज ५०० पोती इतकी असून, शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ४३०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. भविष्यात सोयाबीनच दर चढेच राहतील, असे जाणकारांना वाटते.
हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
गुळाची आवक दररोज ३ हजार भेली इतकी असून, २०० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव २५०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर क्विंटलमागे २० रुपयांनी कमी झाले असून, भाव ३२८० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये क्विंटलमागे ३०० रुपयांची मंदी आली. पामतेल ११८००, सोयाबीन तेल १२५०० आणि सरकी तेलाचे दर १२२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.