लसीकरणात जालना जिल्हा राज्यामध्ये सहाव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:27+5:302021-02-05T08:04:27+5:30

जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेत जालना जिल्हा ...

Jalna district ranks sixth in the state in vaccination | लसीकरणात जालना जिल्हा राज्यामध्ये सहाव्या क्रमांकावर

लसीकरणात जालना जिल्हा राज्यामध्ये सहाव्या क्रमांकावर

जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेत जालना जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. आरोग्य विभागातील जिल्ह्यातील १५ हजारांवर डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नावनोंदणी केली होती. सर्वांचे लसीकरण वेळेत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले आदींची टीम प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर कोरोनाचे लसीकरण केले जात आहे. यात जालना येथील जिल्हा रुग्णालय, भोकरदन, मंठा, बदनापूर, घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालय, जाफराबाद येथील समर्थ स्कूल, जालना शहरातील दीपक हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल येथे लसीकरण केले जात आहे. इतर काही केंद्रांवरही लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. या लसीकरणात आजवर ५६९ डॉक्टर आणि ४४८३ कर्मचारी अशा एकूण ५०५२ जणांनी लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर त्यातील १२२ जणांना सौम्य प्रकारचा त्रास झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्याची तुलना करता जालना जिल्हा लसीकरणामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

डोसचा दुसरा साठा जिल्ह्याला कधी मिळणार?

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी जिल्ह्याला १४२२ ‘वाइल’ प्राप्त झाले होते. त्यात १४ हजार डोसचा समावेश होता. प्राप्त झालेल्या वाइलमधील डोस आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले जात आहेत. नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचे वेळेवर लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांसह इतर विभागांतील फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

फ्रंटलाइनवरील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येनुसार शासनाकडे कोरोना डोसची मागणी केली जाणार आहे. शिवाय, पहिल्या टप्प्यात लस दिलेल्यांना दुसरा डोस देण्यासाठी लागणाऱ्या वाइलची मागणी शासनाकडे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

लसीकरणात महिलांचे प्रमाण अधिक

आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जात आहे. या लसीकरणात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आघाडी घेत लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. इतर सहकारी कर्मचाऱ्यांनीही लस घ्यावी, यासाठी महिला अधिकारी, कर्मचारी जागृती करीत आहेत.

पहिल्या टप्प्यात नोंदणीकृत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. हा लसीकरणाचा टप्पा वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरा डोस आणि दुसऱ्या टप्प्यात लागणाऱ्या लसीची शासनाकडे मागणी केली जाणार आहे

- विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

शेजारील जिल्ह्यात झालेले लसीकरण

बीड ९९ %

बुलडाणा ७० %

परभणी ६० %

औरंगाबाद ६३ %

नांदेड ६९ %

कुठे किती लसीकरण

बीड जिल्ह्यामध्ये ६०३७ जणांचे लसीकरण

परभणी जिल्ह्यामध्ये २४४० जणांचे लसीकरण

बुलडाणा जिल्ह्यामध्ये ४९५० जणांचे लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ७३८६ जणांचे लसीकरण

नांदेड जिल्ह्यामध्ये ४५४३ जणांचे लसीकरण

Web Title: Jalna district ranks sixth in the state in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.