जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैसेवारी ४७.०६ पैसे; दुष्काळी उपाययोजनांस वेग येणार
By विजय मुंडे | Updated: December 15, 2023 20:19 IST2023-12-15T20:18:32+5:302023-12-15T20:19:08+5:30
दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैसेवारी ४७.०६ पैसे; दुष्काळी उपाययोजनांस वेग येणार
जालना : प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी खरीप पिकांची सुधारित अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ती सरासरी ४७.६ पैसे दाखविण्यात आली आहे. यात खरिपातील ५१५ व रब्बीच्या ४५६, अशा एकूण ९७१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली; परंतु पिकांची वाढ होताना वेळेवर पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. कमी पावसाचा परिणाम हा रब्बीतील पिकांवरही झाला आहे. प्रशासनाच्या वतीने खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यातून पिकांची उत्पादकता समोर येते. प्रशासकीय पातळीवरून जाहीर होणारी ही पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली, तर दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी मोठी मदत होते. खरीप हंगामाला बसलेला फटका पाहता शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला; परंतु काही तालुके त्यातून वगळण्यात आली होती.
आता खरिपाची सुधारित अंतिम पैसेवारीच ५० पैशांच्या खाली असल्याने इतर तालुक्यांतील शेतकरी, नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. परतूर तालुक्यातील एकूण ९८ गावांपैकी राणी वाहेगाव हे एक गाव बुडीत क्षेत्रात गेलेले असल्यामुळे ९७ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रशासकीय पातळीवरून अंतिम पैसेवारी जाहीर झाली असली तरी आता शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, लागू होणाऱ्या सवलती आदी बाबींकडे जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांचे लक्ष लागले आहे.
...अशी आहे तालुकानिहाय स्थिती
तालुका- गावे- पैसेवारी
जालना- १५१- ४७
बदनापूर- ९२- ४५.९७
भोकरदन- १५७- ४४.२४
जाफराबाद- १०१- ४८.२१
परतूर- ९७- ४७.०८
मंठा- ११७- ४६.४३
अंबड- १३८- ४९.९
घनसावंगी- ११८- ४८.४३
एकूण- ९७१- ४७.०६