जालना : छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात कारवाई करीत पोलिस कर्मचारी आधार बाजीराव भिसे (वय ३२) याला ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
पोलिस कर्मचारी आधार बाजीराव भिसे हा बदनापूर ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणात तपास अधिकारी म्हणून कार्यरत होता. तक्रारदाराच्या दोन पुतण्यांविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराच्या पुतण्यांना या गुन्ह्यातील पोलिस कोठडी आणि दोषारोपपत्र यामध्ये मदत करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती, ७० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.
मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्यात सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच पोलिस कर्मचारी आधार बाजीराव भिसे याला पंचांसमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शांतिलाल चव्हाण, अंमलदार रवींद्र काळे, अशोक नागरगोजे आणि चालक सीएन बागूल यांनी केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Web Summary : A police officer in Jalana was arrested by the ACB for accepting a ₹70,000 bribe to help suspects in a murder case. He demanded ₹1 lakh initially.
Web Summary : जालना में एक पुलिस अधिकारी को हत्या के मामले में संदिग्धों की मदद करने के लिए ₹70,000 की रिश्वत लेते हुए एसीबी ने गिरफ्तार किया। उसने शुरू में ₹1 लाख की मांग की थी।