- संतोष सारडाबदनापूर ( जालना) : शहरासह तालुक्यात सोमवारी पहाटे वारा व विजांच्या कडकडाटासह चार तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे.
शहरासह तालुक्यात सोमवारी पहाटे चार वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सकाळी आठ वाजेपर्यंत जोरात सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. परंतु पाऊस थांबलेला नव्हता. या पावसामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. येथील तहसील कार्यालयासमोर या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. अनेक वाहनधारकांना साचलेल्या गाळ मिश्रित पाण्यातून कसरत करून वाट काढावी लागली.
या पावसाळ्यात आतापर्यंत अनेक वेळा येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडून अपघात झाला आहे. तसेच याच ठिकाणी शहरातील सोमठाणा येथून आलेली पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी असून या जलवाहिनीत सुद्धा हे साचलेले पाणी जात असल्याने शहराला दूषित पाणी पुरवठा होतो आहे. या भागातील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. याच महामार्गावरून बदनापूर शहरातील व तालुक्यातील अनेक भक्तगण नवरात्र मध्ये सोमठाणा येथील रेणुका देवीच्या दर्शनाला पायी जातात. यापुढेही असाच पाऊस राहिला तर भक्तांना या महामार्गावरून जाण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. २४ तास रहदारी असलेल्या या महामार्गावर अशावेळी अपघात होण्याचा संभव आहे. या महामार्गावर वाहनधारकांकडून टोल वसूल केला जातो मात्र खड्डे बुजवले जात नसल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.
आज झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, मका अशा खरीप पिकांचे नुकसान झाले असून फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.