जाफराबादेत नेतृत्वावरून नेत्यांमध्येच कुरघोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST2021-02-18T04:57:00+5:302021-02-18T04:57:00+5:30
जाफराबाद : आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने प्रारूप याद्यांची प्रसिध्दी आणि सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणुकीचे ...

जाफराबादेत नेतृत्वावरून नेत्यांमध्येच कुरघोडी
जाफराबाद : आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने प्रारूप याद्यांची प्रसिध्दी आणि सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागताच नेतृत्वावरून शहरातील नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू झाल्या आहेत. तर निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांनी प्रारूप मतदार याद्या मिळविण्यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसत आहे.
मागील निवडणुकीत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना अशी लढत झाली होती. मात्र या वेळेस राज्यात आघाडी सरकार असल्याने निवडणूक महाआघाडीत लढणार की, स्वतंत्र लढणार यावर अवलंबून असणार आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्यांनी आपल्या सोयीनुसार भाजपात प्रवेश केला. यामध्ये विद्यमान नगराध्यक्ष यांच्या पतींचाही समावेश आहे. त्यामुळे स्वपक्षातील नेते निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार की विरोधात लढणार हे निवडणुकीच्या काळात स्पष्ट होणार आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. या याद्या मिळविण्यासाठी निवडणुकीत इच्छूक असलेल्या सर्वपक्षीयांनी धावपळ सुरू केली आहे. तर अनेकांनी आतापासूनच मतदारांना आपण निवडणुकीत उभारणार असल्याचे सांगत आपला विकासाचा अजेंडा पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निवडणूक विभागाची प्रक्रिया
निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी २२ फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. तर अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रमाणित करून १ मार्च रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. त्यानंतर ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.