परतूर : पोलिस ठाण्यात वावरत असलेल्या पोलिस मित्रानेच ठाण्यातील एका खोलीची चावी उघडून २ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा चोरल्याची धक्कादायक घटना परतूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने पोलिस मित्र असलेला संशयित छत्रगुण उत्तमराव सोळंके (रा. समित्र कॉलनी, परतूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील जप्त असलेला गुटख्याचा साठा परतूर पोलिस ठाण्यातील एका खोलीत ठेवण्यात आला होता. या खोलीचा ताबा आणि चावी पोकाँ. भागवत खाडे यांच्याकडे होती. खाडे यांच्या टेबलच्या ड्राॅव्हरमधून या खोलीची चावी गायब झाली होती. त्यानंतर गुन्ह्यात जप्त असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात गायब झाला असल्याचे पोलिसांना लक्षात आले. ही बाब लक्षात येताच पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.
त्यावेळी पोलिस ठाण्यात नेहमी वावरणारा छत्रगुण उत्तमराव सोळंके यानेच गुटखा चोरल्याचे दिसून आले. शत्रुघ्न सोळंके याने त्या खोलीची किल्ली चोरी करून खोलीतून २४ जानेवारी २०२३ रोजी पहाटे प्रीमियम राजनिवास गुटखा असलेल्या ५ गोण्या चोरून नेल्या होत्या. नंतर ११ फेब्रुवारी २०२३ रोजी १ लाख ९० हजार रुपये किमतीचा १ हजार गोवा गुटख्याच्या १९ गोण्या असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा गुटखा चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. यामुळे गुरुवारी रात्री याप्रकरणी भागवत खाडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात संशयित छत्रगुण सोळंके या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.