बिनविरोध निवडणुकीचा विषय पडतोय बाजूला....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:09+5:302020-12-23T04:27:09+5:30
अनेक ठिकाणी तरुण युवक निवडणुकीच्या मैदानात टेंभुर्णी परिसरात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका टेंभुर्णी : सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण ...

बिनविरोध निवडणुकीचा विषय पडतोय बाजूला....
अनेक ठिकाणी तरुण युवक निवडणुकीच्या मैदानात
टेंभुर्णी परिसरात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका
टेंभुर्णी : सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापत असून, प्रत्येकजण आखाड्यात दंड थोपटू लागल्याने बिनविरोध निवडणुकीचा विषय बाजुला पडताना दिसत आहे. टेंभुर्णी परिसरात तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णीसह आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यात टेंभुर्णी- गणेशपूर, दहिगाव, आंबेगाव, अकोलादेव, तपोवन- निमखेडा, शिराळा- वाढोणा, सातेफळ, डोणगाव या आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शासनपातळीवरून बिनविरोध निवडणुकीसाठी गावांना विकासनिधी उपलब्ध करून दिला जात असला तरी परिसरात बुधवारपासून आवेदनपत्र भरणे सुरू झाले तरी कुठल्याच गावात बिनविरोध निवडणुकीसाठी ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसत नाही. यावर्षीच्या निवडणुकीत अनेक गावात तरुण युवक निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याने गावागावात निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. यामुळे गावातील जेष्ठ राजकारण्यांनी बिनविरोध निवडणुकीचा विषय मांडला तरी तरुणांकडून तो उधळून लावला जात असल्याचेही चित्र काही गावांत दिसू लागले आहे. यामुळे आता बिनविरोध निवडणुकीचा विषय बाजूला ठेवून तु तिकडून तर मी इकडून म्हणत अनेकजण एकमेकांसमोर आव्हान उभे करीत असल्याने ग्रामपंचायतीचा आखाडा चांगलाच गाजणार असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय इच्छाशक्तींंचा पुढाकार गरजेचा
अद्याप आवेदनपत्र भरणे सुरू झाले असले तरी अजून आवेदनपत्र मागे घेण्यासाठी सात दिवसांचा अवकाश आहे. तोपर्यंत जर गावागावात बैठकी घेवून बिनविरोधसाठी पुढाकार घेतला तर काही गावे तरी बिनविरोध निघतील. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
शंकरराव देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, दहिगाव.
पुढाकार घेतला पण प्रतिसाद नाही
मावळत्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद माझ्याकडे होते. निवडणुकीमुळे गाव गटा- तटात विभागले जाते. हे तंटे गावाला पुढील पाच वर्षे तर काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या पुरतात. म्हणून या निवडणुकीत मी बिनविरोध साठी पुढाकार घेतला. स्वत:हून विरोधी पैनलला जावून भेटलो. त्यांना सरपंच पदाचीही ऑफर दिली. परंतु, तरीही हा प्रस्ताव उधळून लावण्यात आला. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे.
ॲड. रामकृष्ण बनकर, मावळते सरपंच, सातेफळ.
या निवडणुकीसाठी मी गावातील तरुणांना एकत्रित करून पैनल तयार केले आहे. प्रत्येकाची निवडणूक लढण्याची पहिलीच वेळ असल्याने प्रत्येकजण उत्साही आहे. मात्र गावचा विकास करणारी चांगली माणसे पुढे येत असतील तर बिनविरोधसाठीही आमची तयारी आहे. फक्त त्यात योग्य प्रमाणात तरुणांनाही संधी मिळाली पाहिजे.
विशाल फलके, युवा कार्यकर्ता, तपोवन गोंधन.