चालू बसमध्ये औषध प्राशन करणाऱ्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:30+5:302021-01-08T05:41:30+5:30
जालना : गुलबर्ग्याहून जालन्याकडे येणाऱ्या बसमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीने औषध प्राशन केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ...

चालू बसमध्ये औषध प्राशन करणाऱ्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू
जालना : गुलबर्ग्याहून जालन्याकडे येणाऱ्या बसमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीने औषध प्राशन केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गेवराई ते वडीगोद्रीदरम्यान घडली. सदरील व्यक्तीचा रात्री एक वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटली नसल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेश साळवे यांनी दिली.
गुलबर्गा -जालना ही बस रविवारी रात्री प्रवासी घेऊन गुलबर्ग्याहून जालन्याकडे येत होती. गेवराई बसस्थानकात एक ५५ वर्षीय इसम बसमध्ये चढला. त्याने अंबडपर्यंतचे तिकीटही काढले. गेवराई ते वडीगोद्रीदरम्यान सदरील इसमाने त्याच्याजवळ असलेले विषारी औषध प्राशन केले. बसमध्ये विषारी औषधाची दुर्गंधी येत असल्याने वाहकाने गाडी थांबवून प्रवाशांना विचारले असता, सदरील इसमाने विषारी औषध प्राशन केल्याचे कळाले. चालकाने बस अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेवून सदरील व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याला पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री एक वाजेच्या सुमारास सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरी व्यक्तीची ओळख पटली नसून, त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश साळवे करीत आहेत.