नुकसानीची पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:15+5:302021-09-07T04:36:15+5:30
अंबड, वडीगोद्री : अंबड तालुक्यात शनिवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी विजय ...

नुकसानीची पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
अंबड, वडीगोद्री : अंबड तालुक्यात शनिवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी रविवारी केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही टोपे यांनी या वेळी दिली.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार विद्याचरण कडवकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कणके, संजय गांधी निराधारचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नरवडे, सहदेव भारती, दत्ता केजभट, अंगद काळे, संजय कणके, महादेव तांबडे, गजानन चौधरी, अर्जुन चौधरी, गोवर्धन तांबडे, विठ्ठल झिजुर्डे, विश्वंबर गारुळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
अंबड तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पिकांचे नुकसान झाले असून, मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच उसाचे पीक आडवे झाले आहे. काही ठिकाणी रस्ते, पूल तसेच जनावरे वाहून गेली आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी या वेळी सांगितले.
टोपे यांनी पाथरवाला बुद्रूक, राजेश नगर, महाकाळा, बळेगाव, साष्ठ पिंपळगाव, दह्याला, भांबेरी, धाकलगाव, वडीगोद्री, चंदनापुरी खुर्द आदी ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.