Inspection of CCTV footage at 15 places | २५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
२५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटल्या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची दोन व चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एक पथक कार्यरत आहेत. घटनेनंतर जवळपास २५ ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली असून, आरोपींच्या लवकरच मुस्क्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जालना येथील बडी सडक रोडवर बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीची मुख्य शाखा आहे. शाखेतील कर्मचारी गणेश कागणे व अरविंद देशमुख हे दोघे सोमवारी सकाळी मुख्य शाखेतून ३ लाख रूपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून नवीन मोंढा भागातील शाखेकडे जात होते. नवीन मोंढा भागातील मारूती मंदिराच्या जवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३ लाखाची रोकड लंपास केली होती. घटनेनंतर स्थागुशाचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमीने दिलेल्या जबाबावरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच जवळील पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली होती. तसेच घटनेनंतर आजवर या भागातील जवळपास २५ ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासण्यात आले आहे. यातून गुन्ह्यासंदर्भात काही माहिती, संशयित हालचालींची पाहणी पोलिसांनी केली आहे. शिवाय आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके कार्यरत आहेत. लवकरच आरोपींना अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर सोमवारी रात्री शहरासह परिसरातील विविध भागांत पोलिसांनी कोंबिंग आॅपरेशन केले. या कोंबिंग आॅपरेशनमध्ये संशयितांची धरपकड करण्यात आली. यात विविध गुन्ह्यांतील दोन संशयितही पोलिसांच्या हाती लागले असून, लूटमार प्रकरणात सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांचीही तपासणी केली जात आहे.

Web Title:  Inspection of CCTV footage at 15 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.