गावाच्या स्वच्छतेसाठी महिला सरपंचांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:53+5:302021-01-03T04:30:53+5:30
पापळच्या सरपंच अश्विनी जाधव यांचा उपक्रम टेंभुर्णी : केवळ स्वच्छता अभियानावर व्याख्याने आणि भाषणे दिल्याने हे अभियान यशस्वी होणार ...

गावाच्या स्वच्छतेसाठी महिला सरपंचांचा पुढाकार
पापळच्या सरपंच अश्विनी जाधव यांचा उपक्रम
टेंभुर्णी : केवळ स्वच्छता अभियानावर व्याख्याने आणि भाषणे दिल्याने हे अभियान यशस्वी होणार नाही, तर यासाठी ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे स्वत: कृती करण्याची गरज आहे. आपल्या गावच्या स्वच्छतेचा विडा अशाच एका महिला सरपंचाने उचलला आहे.
जाफराबाद तालुक्यातील पापळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी मनोहर जाधव या दर महिन्याला गावाच्या स्वच्छतेसाठी स्वत:चा काही वेळ देतात. केवळ आदेशच देत नाहीत, तर कधी खराटा तर कधी फावडे हातात घेऊन स्वत: गावाची स्वच्छता करतात. मग नाल्यांतील घाण काढायलाही त्यांना कसलाच कमीपणा वाटत नाही.
एरवी महिला पदाधिकाऱ्यांचा राजकारणातील सहभाग केवळ कागदोपत्रीच राहत असला तरी कार्यालयीन कामांसह गावातील प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी ही सरपंच महिला सध्या राजकारणात काम करणाऱ्या महिलांसाठी एक आदर्श ठरू पाहत आहे. पापळ या गावात महिला सरपंच अश्विनी जाधव यांच्या पुढाकाराने दर महिन्याला स्वच्छता अभियान राबविले जाते. यात सरपंच जाधव स्वत: स्वच्छतेसाठी सर्वांच्या पुढे असतात. स्वत: सरपंच काम करीत असल्याने गावातील इतर ग्रामस्थही हिरीरीने आपापल्या घरासमोरील स्वच्छता करण्यासाठी पुढे येतात.
कोट
स्वच्छतेचे पुजारी असलेल्या संत गाडगेबाबांसारख्या संतांनी ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे स्वत: हातात खराटा घेऊन गावची-गावे स्वच्छ केली. प्रत्येक माणसाने जर आपल्यापासून स्वच्छतेची सुरुवात केली, तर गाव स्वच्छ होण्यास वेळ लागत नाही. माझ्या गावात दर १५ दिवसांनी आम्ही नाल्यांची सफाई करतो. आमच्या गावातील सर्वच ग्रामस्थ गावच्या स्वच्छतेप्रती जागरूक असल्याने गाव नेहमीकरता स्वच्छ व सुंदर राहते.
अश्विनी जाधव, सरपंच, पापळ