रब्बीतील पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:28+5:302020-12-23T04:26:28+5:30
लहान फोटो वडीगोद्री : अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या आशा असलेल्या रब्बी पिकांवरही आता लष्करी ...

रब्बीतील पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
लहान फोटो
वडीगोद्री : अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या आशा असलेल्या रब्बी पिकांवरही आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
अंबड तालुक्यात भौगोलिक क्षेत्र हे १,१६,७८३ हेक्टर असून, पेरणीलायक १ लाख ७ हजार २७३ हेक्टर क्षेत्र आहे. यात जिरायत ज्वारीचा १० हजार १९७ हेक्टर पेरा झालेला आहे. यंदा झालेल्या दमदार पावसामुळे वडीगोद्रीसह परिसरातील लहान-मोठ्या प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला आहे. जलस्तर उंचावल्याने बोअरसह विहिरींनाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह गहू, हरभरा आदी पिकांवर भर दिला आहे.
परिसरात ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. प्रारंभी पेरणी उरकलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकांची चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. मात्र, आता या पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. अळी पोग्यात शिरकाव करीत असल्याने ज्वारीचा संपूर्ण ठोंब जळून जात आहेत. त्यामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. परंतु कीटकनाशकांच्या किंमती शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. एकरी दीड हजारांचा खर्च येत असल्याने उत्पादन हाती पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडू लागले आहे.
प्रतिक्रिया
ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या हातून जातात की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
बाबासाहेब दखणे
शेतकरी, अंतरवाली सराटी
उपाययोजना कराव्यात
तालुक्यात ज्वारी पिकाचा समाधानकारक पेरा झाला आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर रोगराईसह अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून वेळीच उपायोजना कराव्यात. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.
सचिन गिरी, तालुका कृषी अधिकारी