दोन प्रमुख पॅनलसह अपक्षांच्या पॅनल प्रचाराचे फुटले नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:43+5:302021-01-09T04:25:43+5:30

प्रचाराची रंगत वाढली : उमेदवार काढत आहेत प्रभाग पिंजून टेंभुर्णी : संपूर्ण जाफराबाद तालुक्याचे लक्ष लागलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीच्या ...

Independent panel campaign with two major panels cracked coconut | दोन प्रमुख पॅनलसह अपक्षांच्या पॅनल प्रचाराचे फुटले नारळ

दोन प्रमुख पॅनलसह अपक्षांच्या पॅनल प्रचाराचे फुटले नारळ

प्रचाराची रंगत वाढली : उमेदवार काढत आहेत प्रभाग पिंजून

टेंभुर्णी : संपूर्ण जाफराबाद तालुक्याचे लक्ष लागलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या प्रमुख दोन पॅनलसह अपक्षांनी मिळून केलेल्या तिसऱ्या अफलातून पॅनलचेही प्रचाराचे नारळ फुटल्याने आता गावात रॅल्या आणि गृहभेटीने गाव दणाणून गेले आहे.

टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी तब्बल ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे भाजप पुरस्कृत एक पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत एक पॅनल, अशी सरळ लढत होत आहे. असे असले तरी प्रत्येक वॉर्डातून निवडणूक लढवीत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आपले स्वतंत्र पॅनल बनवीत दोन्ही प्रमुख पॅनलसमोर आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत २४ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. यातील काही उमेदवारांनी वॉर्डावॉर्डांत कोठे दोघे, तर कोठे तिघे अशा साखळ्याही तयार केल्या आहेत. मावळत्या ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण पाच वर्षे भाजप व राष्ट्रवादी यांच्यात लपाछपीचा खेळ सुरू राहिल्याने सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे जनतेला पाच वर्षांतही कळू शकले नाही. त्यामुळे आता एकमेकांवर कसे आरोप- प्रत्यारोप करायचे, हा प्रश्न प्रमुख दोन्ही पॅनलसमोर पडला आहे. त्याचा फायदा मात्र अपक्ष उमेदवार चांगला घेत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दोन्ही पॅनलचा खरपूस समाचार घेत आहेत.

अपक्षांच्या पॅनलमध्ये विरोधकही साथ-साथ

सर्व अपक्ष उमेदवारांनी मिळून आपल्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ गुरुवारी फोडला. यावेळी गावातील सर्व अपक्ष उमेदवार एकाच मंचावर उपस्थित झाले होते. यात एकाच प्रभागातून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणारे सोबत एकाच ठिकाणी आल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात आपण तर एकमेकांच्या विरोधात उभे आहोत, हे जेव्हा काही अपक्षांच्या लक्षात आले तेव्हा हे आपले पॅनल नाही रे बाबा, म्हणत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, विरोधकांच्या या साथ- साथ पॅनलची गुरुवारी गावात एकच चर्चा होती.

फोटो ओळ :

टेंभुणी येथील एका पॅनलने गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर संपूर्ण गावातून रॅली काढली. या रॅलीने सर्व मतदारांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जि.प. सदस्य शालिकराम म्हस्के, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, कृषिभूषण माधवराव अंधारे, फैसल चाऊस आदींची उपस्थिती होती.

Web Title: Independent panel campaign with two major panels cracked coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.