रांजणीत तीन पॅनलसह अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:12+5:302021-01-04T04:26:12+5:30
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या रांजणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनलसह अपक्ष आपले नशीब आजमावीत ...

रांजणीत तीन पॅनलसह अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या रांजणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनलसह अपक्ष आपले नशीब आजमावीत आहेत. काही वाॅर्डात तिरंगी तर काही वाॅर्डात चौरंगी लढती होत आहेत. राजकीय कुरघोड्यांमुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
रांजणी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ६५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी किती जण माघार घेतात, त्यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पॅनल व सेनेचे एक पॅनल आहे. तर काही अपक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावत आहेत. १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत मागील तीन टर्मपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट परस्परांसमोर उभे असून, शिवसेनेचीसुध्दा येथे लढत होत आहे. सर्व गावाचे लक्ष वाॅर्ड क्रमांक एक व दोनवर लागले आहे. आरक्षणात ही ग्रामपंचायत खुल्या प्रवगार्साठी सुटली होती. त्यामुळे निवडणूक घोषणा झाल्यापासून वातावरण चांगलेच तापले होते. आरक्षण रद्द झाले तरी इच्छुकांचा उत्साह कायम असल्याचे दिसत आहे. आपलाच उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी पॅनलप्रमुख आपली शक्ती पणाला लावत आहेत. गावात अमोल देशमुख, आबासाहेब वरखडे व श्यामराव देशमुख हे आपापल्या पॅनेलचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकंदरीत येथील ग्रामपंचायत निवडणूक अखेरपर्यंत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.