हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना
By Admin | Updated: October 12, 2016 23:49 IST2016-10-12T23:41:36+5:302016-10-12T23:49:09+5:30
जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे

हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना
जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
गत चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झाला. मुगासह सर्वच पिकांचे उत्पादन चांगले निघाले. मुगाचे चांगले उत्पादन निघाल्याने नाफेडने शेतकऱ्यानां हमीभाव मिळावा म्हणून तात्काळ खरेदी केंद्र सुरू केले. बाजार समिती परिसरात हे केंद्र सुरू करण्यात आले. दीड महिन्यानंतर या केंद्रात फक्त १६ क्विंटल मुगाची आवक झाली. केंद्राकडून ५२२५ प्रति क्विंटलला भाव देण्यात येत आहे. हमीभावाची खात्री असली तरी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अल्प प्रतिसाद का मिळत आहे हे कोडेच आहे. प्रारंभीला मुगाची १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्याने केंद्राने मूग खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांनी येण्याचे टाळले. विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांकडून अडवणूक होऊ नये म्हणून केंद्र सुरू झाले. केंद्रात पाच कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा म्हणून शेतकऱ्यांना सूचनाही करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात दीड महिन्यात या केंद्रात फक्त १६ क्ंिवटल मुगाची आवक झाली. यंदा कडधान्य वर्ष असल्याने कृषी विभागाकडूनही तूर, मूग, उडीद आदी कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर वरूणराजाने कृपा केल्याने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मुगाचे पीक जोमात आले आहे. जालना बाजार समितीतही दिवसाकाठी पाचेश ते हजार क्विंटल मुगाची आवक वाढत आहे. त्याचबरोबर तालुकास्थानच्या बाजार समितीही मुगाची आवक चांगली होत आहे. हमीभाव केंद्रात तीन प्रकारांत मुगाची खरेदी केली जाते. त्यात पूर्ण वाळलेला, मध्यम वाळलेला असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांना पूर्णपणे वाळलेला मूग आणत नसल्याने या हमीभाव केंद्रात आवक कमी आहे.