२२५ रूपये वाढविले, अन् केवळ १० रूपये कमी केले ‘व्वा रे चालखी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:03+5:302021-04-04T04:31:03+5:30
मागील काही दिवसापासून घरगुती गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे ...

२२५ रूपये वाढविले, अन् केवळ १० रूपये कमी केले ‘व्वा रे चालखी’
मागील काही दिवसापासून घरगुती गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत दिलेले गॅस सिलिंडर महिलांनी बाजूला काढून चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. शासनाने गॅस सिलिंडरचे दर कमी करावे, यासाठी विविध संघटना, पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. याची शासनाने दखल देखील घेतली. शासनाने १ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. गेल्या वर्षभरात २२५ रूपयांनी महाग झालेले सिलिंडर केवळ दहा रूपयांनी स्वस्त झाले आहे. शासनाने गॅसचे दर केवळ १० रूपयांनी कमी केल्याने गृहिणींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वर्षभरापासून गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे आमचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात हाताला काम नसल्याने आर्थिक अडचण आहे. अशात गॅसचे दर वाढत आहे. त्यातच शासनाने केवळ १० रुपयांनी गॅसचे दर कमी करून सर्वसामान्यांची थट्टा उडविली आहे.
निर्मला पवळ, गृहिणी
गॅसचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. तरीही शासन सर्वसामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच शासनाने दहा रूपयांनी गॅसचे दर कमी केले. शासनाने गॅसचे दर कमी करावे.
उमा शेंडगे, गृहिणी
मला उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस मिळाला आहे. सुरुवातील गॅसचे दर कमी असल्याने मी गॅसवरच स्वयंपाक केला. परंतु, त्यानंतर सतत गॅसच्या दरात वाढ होत असल्याने मला गॅस बाजूला ठेवावा लागला. आता मी चुलीवर स्वयंपाक करीत आहे. शासनाने लक्ष द्यावे.
प्रियंका खैरे, गृहिणी