ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:48+5:302021-01-08T05:41:48+5:30
पालकांची वाढली चिंता ; विविध शैक्षणिक ॲपचा मोठा वापर, मैदानी खेळाकडे होतेय दुर्लक्ष जालना : कोरोनामुळे मागील काही ...

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे
पालकांची वाढली चिंता ; विविध शैक्षणिक ॲपचा मोठा वापर, मैदानी खेळाकडे होतेय दुर्लक्ष
जालना : कोरोनामुळे मागील काही दिवसापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यामुळे तासनतास विद्यार्थी मोबाईलचा वापर करीत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची मानसिक व शारीरिक वाढ खुंटली आहे.
राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील नऊ ते दहा महिन्यांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.
परंतु, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यी तासनतास मोबाईलचा वापर करीत आहे. तर काही विद्यार्थी ऑनलाईन गेम्स खेळत असल्याने मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना डोळेदुखी, भूक न लागणे आदी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.
एका खासगी रूग्णालयात मागील काही दिवसांपासून डोळ्याच्या आजाराचे रूग्ण वाढले आहेत. मागील महिन्याभरात तब्बल १५० विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालकांनी जास्त वेळ विद्यार्थ्यांकडे मोबाईल देऊ नये, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
ऑनलाईन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम
शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. परंतु, याच्या दुष्परिणामांची पालक चिंतेत आहे. मैदानी खेळांकडे दुर्लक्ष, सतत मोबाईलचा वापर केल्याने डोके दुखणे, शारीरिक मानसिक वाढ खुंटणे, भूक न लागणे, वेळेवर झोप न होणे आदी आजारांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.
मोबाईलचा वापर कमी करा
कोरोनामुळे राज्यात मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यामुळे मोबाईलचा वापर वाढला असून, बहुतांश विद्यार्थ्यांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पालकांनी काळजी घ्यावी.
-डॉ.प्रदीप पंडित,
बालरोगतज्ज्ञ
डोळ्यांना त्रास
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी तासनतास मोबाईलचा वापर करीत आहे. काही विद्यार्थ्यांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने ऑनलाईन शिक्षण बंद करावे.
-समाधान शेजुळ
पालक