कोरोनामुक्तीनंतर रुग्णांचे वजन वाढल्याच्या तक्रारींत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:00+5:302021-02-05T08:05:00+5:30
जालना : कोरोनामुक्त झाल्यानंतर तज्ज्ञांनी शारीरिक हलचाली कमी करून आराम करण्याचा सल्ला दिला होता; परंतु अनेकांनी अधिक वेळ केलेला ...

कोरोनामुक्तीनंतर रुग्णांचे वजन वाढल्याच्या तक्रारींत वाढ
जालना : कोरोनामुक्त झाल्यानंतर तज्ज्ञांनी शारीरिक हलचाली कमी करून आराम करण्याचा सल्ला दिला होता; परंतु अनेकांनी अधिक वेळ केलेला आराम आणि बंद असलेली शारीरिक हलचाल यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्यांपैकी एक हजारावर नागिरक लठ्ठपणा वाढल्याच्या तक्रारी करीत आहेत.
कोरोनाची लागण झाल्यानंतर विषाणू थेट फुफ्फुसावर परिणाम करीत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी शारीरिक हलचाल कमी करून काही काळ आराम करावा, असा सल्ला दिला जात आहे; परंतु अनेक जण अधिकचा आराम करीत असून, प्रोटिन मिळविण्यासाठी अधिकचा आहार घेत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतर वजन वाढल्याच्या तक्रारींमध्येही काहीशी वाढ होत आहे.
आधी ६७ आता ७४ किलो
कोरोनाची लागण होण्यापूर्वी माझे वजन ६७ किलो होते. कोरोनाची झालेली लागण आणि कोरोनामुक्तीनंतरचे उपचार या कालावधीत माझे वजन ७४ किलो झाले आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर अधिकाधिक आराम आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार घेतला आहे; परंतु वजन वाढल्याने काहीसा त्रास जाणवत आहे.
कोरोनापूर्वी नियमित व्यायाम आणि कार्यालयीन काम करताना होणारी हलचाल यामुळे वजन अधिकचे वाढत नव्हते. आठवडाभर सुटी असली तरीही वजनावर काही परिणाम नव्हता; परंतु कोरोनामुक्तीनंतर वजन वाढले आहे.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम सुरू केला आहे. प्रारंभी कमी वेळ व्यायाम करीत असून, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हळूहळू व्यायाम वाढविणार वाढवून मी माझे वाढलेले वजन कमी करणार असल्याचे एका करोनामुक्त कर्मचाऱ्याने सांगितले.
वाढलेल्या आहाराचा परिणाम
उपचारादरम्यान रुग्णांना औषधाच्या माध्यमातून स्टेरॉइड दिले जाते. शिवाय कोरोनामुक्तीनंतर आराम करण्याचा सल्लाही दिला जात आहे.
शिवाय अधिकाधिक प्रोटीन मिळावे, यासाठी दैनंदिन जेवणात अनेकांनी विविध खाद्यपदार्थांची वाढ केली जात आहे. त्यामुळे वजन वाढत आहे.
एकीकडे औषधाचे डोस, कमी झालेली शारीरिक हलचाल आणि वाढलेले जेवण यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये वजन वाढल्याच्या तक्ररी दिसून येत आहेत. शिवाय अनेक जण घरगुती उपचार घेत असल्याचाही परिणाम जाणवत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसावर विषाणूंचा परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी अधिक शारीरिक हलचाली न करता आराम करण्याचा सल्ला दिला जातो.
- डॉ. आशिष राठोड, कोविड रुग्णालय
एकूण कोरोना रुग्ण १३६४५
बरे झालेले रुग्ण १३१००
वजन वाढल्याच्या तक्रारी असलेले १०००
कोरोनामुक्त ४० रुग्ण ओपीडीत आल्यानंतर वजन वाढल्याच्या तक्रारी करीत आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार वजन कमी करण्यावरही अनेकांनी भर दिला आहे.