सुधारित... प्रति माह 2 लाख 95 हजार कार्डधारकांना मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:16+5:302020-12-23T04:27:16+5:30

जालना : कोरोनातील लॉकडाऊनमध्ये गरजूंना आधार ठरलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटपाची डेडलाइन संपली आहे. त्यामुळे आता ...

Improved ... Free food to 2 lakh 95 thousand cardholders per month | सुधारित... प्रति माह 2 लाख 95 हजार कार्डधारकांना मोफत धान्य

सुधारित... प्रति माह 2 लाख 95 हजार कार्डधारकांना मोफत धान्य

जालना : कोरोनातील लॉकडाऊनमध्ये गरजूंना आधार ठरलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटपाची डेडलाइन संपली आहे. त्यामुळे आता ज्यांच्या हाताला अद्यापही काम नाही, अशा गरजूंची मोठी गैरसोय होणार असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब पाहता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मोफत धान्य वाटप केले. जिल्ह्यात प्रति माह सरासरी तीन हजारांवर कुटुंबांना याचा लाभ मिळाला. यात १७ हजार ५१६ टन गहू, ३७ हजार ६०५ टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. यात डाळींचेही मोफत वाटप करण्यात आले आहे. याचा प्रति माह जवळपास २ लाख ९० हजारांहून अधिक कार्डधारकांना लाभ मिळाला. मात्र, मोफत धान्य वाटपाची डेडलाइन आता संपली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही. काही व्यवसाय, कंपन्या बंद असल्याने तेथील कामगारांचेही प्रश्न कायम आहेत. त्यामुळे शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देऊन जिल्ह्यातील गरजूंना मोफत धान्य वाटपाची मागणी होत आहे.

रोजगाराचा प्रश्न कायम आहे, पोट कसे भरणार

मोफत धान्य वाटपामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला. लॉकडाऊन शिथिल असले तरी आजही आमच्या अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडलेलीच आहे. त्यामुळे पोट कसे भरायचे? असा प्रश्न असून, शासनाने गरजूंना मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी वडीगोद्री येथील अविनाश खरात यांनी केली.

हाताला काम नसल्याने अनेक प्रश्न कायम

लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी आजही आमच्यासारख्या अनेक गरजूंच्या हाताला काम मिळालेले नाही. त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यात आता मोफत धान्य मिळणार की नाही? हा प्रश्न कायम असून, मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी तीर्थपुरी येथील राजेंद्र जाधव यांनी केली.

लाखो लोकांना मिळाला आधार

शासनाने मोफत धान्याचे वाटप केले. मासिक २ लाख ९० हजारांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळाला. त्यामुळे हाताला काम नसलेल्या जिल्ह्यातील लाखो नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला.

शासन निर्देशानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय इतर शासकीय योजनांमधून कार्डधारकांना धान्य वाटप केले जात आहे. मोफत धान्य वाटपाबाबत शासनस्तरावरून, वरिष्ठस्तरावरून येणाऱ्या सूचनेनुसार काम केले जाईल.

-श्रीकांत भुजबळ, तहसीलदार

Web Title: Improved ... Free food to 2 lakh 95 thousand cardholders per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.