गोदावरी नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:05+5:302021-04-04T04:31:05+5:30
गोदावरी नदीच्या पलीकडे बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर अलिकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. शहागडच्या औरंगाबाद - सोलापूर ...

गोदावरी नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा
गोदावरी नदीच्या पलीकडे बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर अलिकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. शहागडच्या औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जोडलेल्या जुन्या पुलाखालून दिवस रात्र अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. त्यांना ना महसूलचे भय आहे, ना पोलिसांचे. या अवैध वाळू तस्करांविरुद्ध गेवराई (जि. बीड), शहागड (ता. अंबड) दोन्हीकडील महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. महसूल व पोलीस यांची भूमिका संशयास्पद असून, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.
घरकुलाच्या नावाखाली आपेगावातून वारेमाप अवैध वाळू उत्खनन
घरकुलासाठी वाळू उपलब्ध व्हावी म्हणून आपेगाव येथून शासकीय कामासाठी जेसीबी पोकलेनच्या साहाय्याने वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने आपेगाव, शहागड, कुरण, गोंदी परिसरातील वाळू घाटावर लक्ष केंद्रित करून तस्करांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध वाळू उत्खनन व तस्करी बंद व्हावी, याकरिता पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शिफारशीनुसार पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना गोंदी पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आल्यापासून परिसरातील अवैध वाळू तस्करी पूर्णतः बंद झाली होती.
मात्र काही दिवसापासून दिवसाढवळ्या गोदापात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होताना दिसत आहे.