कोणतेही काम जिद्दीने केल्यास हमखास यश मिळते -गजानन मिसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:56+5:302020-12-27T04:22:56+5:30
जालना : आपल्या यशात महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी शिकविलेल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन ...

कोणतेही काम जिद्दीने केल्यास हमखास यश मिळते -गजानन मिसाळ
जालना : आपल्या यशात महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी शिकविलेल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सर्व शिक्षकांनी मला वेळोवेळी प्रेरणा देऊन माझे मनोबल वाढविले. त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. तरुणांनी कोणतेही काम आवडीने व जिद्दीने केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन मांडवा गावचे सुपुत्र गजानन मिसाळ यांनी केले.
जिल्ह्यातील मांडवा गावचे सुपुत्र गजानन मिसाळ यांनी बुलेटच्या मागच्या लाइटवर बसून, दोन तास २७ मिनिटांत १११ किलोमीटर अंतर कापून विश्वविक्रम केला. मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे त्यांनी केलेल्या विश्वविक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा मत्स्योदरी अध्यापक विद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीने सत्कार केला. हा कार्यक्रम शहरातील यशवंत नगर येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात अॅड. संजय काळबांडे म्हणाले की, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसेच आयुष्यात पालकांनी संपत्ती कमवण्यापेक्षा आपल्या पाल्यांना चांगले संस्कार दिल्यास त्यातून मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ असतो, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. वाल्मीक घुगे यांनी केले. प्रा. येवते, प्रा. मांटे, प्राचार्य वडजे, प्राचार्य अकोलकर, प्राचार्य तारगे, वर्षा चंद, सुशील ढाकणे, मनोज गायके, प्रमोद टोपे, अमोल मचे, छाया पवार, गीता गावंडे, प्रा. लक्ष्मण पानखडे, अॅड. लक्ष्मण उढाण, बाळासाहेब आर्दड, मुकेश मुंडे, विनोद यादव, नितीन तोनगिरे, किरण गाडे, गौरव नांगरे, बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. दरगुडे यांनी केले, तर आभार प्रा. अभय हातोटे यांनी मानले.