- पवन पवारवडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या भूमिकेवरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. "तुम्ही मराठा आरक्षणाच्या जीआरला कोर्टात आव्हान दिले, तर आम्हीही ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ. आमचा जीआर खूप रक्त जाळून मिळवला आहे, त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे कोट्यवधींच्या संख्येने रस्त्यावर दिसू," असा आक्रमक इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "भुजबळांना मराठा आणि सरकारची मने जुळलेली आवडत नाही. त्यांना फक्त ओबीसीच्या नावाखाली राजकीय पद हवे आहे." ते पुढे म्हणाले की, भुजबळ फक्त आपल्या स्वार्थासाठी 'ओबीसी, ओबीसी' करत आहेत आणि इतर जातींना मराठ्यांपासून तोडण्याचे काम करत आहेत. हा भुजबळांचा डाव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आला असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
१९९४ च्या जीआरला आव्हान देणारजरांगे पाटील यांनी यावेळी ओबीसी आरक्षणासंदर्भात एक मोठा इशारा दिला. ते म्हणाले, "तुम्ही जर आमच्या जीआरला काही करू शकलात, तर तुमच्या १९९४ च्या जीआरला आणि ५० टक्क्यांच्या वरच्या २ टक्के आरक्षणालाही धोका आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही याचिका दाखल करायला लागलात तर आम्ही सुद्धा आता १९९४ च्या जीआर संदर्भात याचिका दाखल करणार आहोत." त्यासाठी सर्व कागदपत्रे वकिलांनी तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्क्यांच्या वर २ टक्के आरक्षण ठेवता येत नाही, ही बाजूही ते न्यायालयात मांडणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सावध राहण्याचा सल्लापंकजा मुंडे यांच्या कथित वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, "मी पंकजा मुंडे काय बोलल्या, ते ऐकले नाही, पण मला वाटत नाही की त्या असं बोलतील. जर त्या असं बोलल्याच असतील तर मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे." ते पुढे म्हणाले, "मराठ्यांच्या मतांवर ज्यांचे राजकीय करिअर मोठे झाले, तेच नेते जर कुणबी प्रमाणपत्र निघाले असूनही गोरगरीब मराठा लेकरांच्या मुळावर घाव घालत असतील तर हे योग्य नाही." यावेळी त्यांनी मराठवाड्यातील आणि बीड जिल्ह्यातील मराठा नेत्यांना जातीचा विचार करून एकजुटीने काम करण्याचा सल्ला दिला. "आपले खरे आरक्षण असून हे जर बोगस म्हणणारे असतील तर हे १६ टक्के बोगस आरक्षण खात आहेत, त्याविषयी सुद्धा आपल्याला आवाज उठवावा लागेल," असेही ते म्हणाले.