सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:11+5:302021-08-14T04:35:11+5:30
जालना : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, अकरावीचे प्रवेश कोणत्या पद्धतीने करावयाचे याबाबत शासनाकडून ...

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
जालना : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, अकरावीचे प्रवेश कोणत्या पद्धतीने करावयाचे याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शाळा प्रशासनासह विद्यार्थी, पालकांची संभ्रमावस्था कायम आहे.
कोरोनामुळे यंदा परीक्षा न घेता मुलांच्या वार्षिक अहवालानुसार गुणदान करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश मुलांची टक्केवारी ९० च्याही पुढे गेली आहे. त्यात अकरावी प्रवेशासाठी होणारी टीईटी परीक्षाही आता रद्द करण्यात आली आहे. परंतु, दहावीच्या गुणवत्तेवर अकरावीत प्रवेश द्यायचे की इतर पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवायची ? याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत.
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
अकरावी प्रवेश प्रक्रियेत काही महाविद्यालयातील सायन्स शाखेतील प्रवेशाचा कटऑफ ९०, तर कॉमर्सचा कटऑफ हा ८० ते ९५ असतो. परंतु, यंदा दहावीच्या गुणवत्तेवर प्रवेश प्रक्रिया देण्याचे शासनाने जाहीर केले, तर सर्वच महाविद्यालयांचा हा कटऑफ वाढणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची
टीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देश देणे गरजेचे आहे. शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश आल्यानंतर त्या पद्धतीने अकरावीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
- शिवशंकर घुमरे, प्राचार्य
स्पर्धा परीक्षेमध्ये व नीट परीक्षेत क्षमता विकसित करण्यासाठी सीईटी आवश्यक आहे. परंतु, शासनाने ही परीक्षा रद्द केली आहे. आता शासनाचे जे निर्देश येतील त्यानुसारच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे.
- डॉ. भारत खंदारे, प्राचार्य
विद्यार्थी चिंतेत
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यात आता सीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याची चिंता कायम आहे.
- श्रीदेव अडाणी, विद्यार्थी
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा निर्णय झाला. आम्ही त्याची तयारी केली. परंतु, ती परीक्षा रद्द झाली. आता पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
- मनोज उदेवाल, विद्यार्थी