घरांचे हप्ते सुरू; मुलांचे शिक्षण अद्यापही बाकी, मग स्वेच्छानिवृत्ती कशी घेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:39+5:302021-01-04T04:25:39+5:30
जालना : राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना मागील काही दिवसांपासून जाहीर ...

घरांचे हप्ते सुरू; मुलांचे शिक्षण अद्यापही बाकी, मग स्वेच्छानिवृत्ती कशी घेणार ?
जालना : राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना मागील काही दिवसांपासून जाहीर केली आहे; परंतु अद्याप घरांचे हप्ते सुरू असून, मुलांचे शिक्षण बाकी असून, स्वेच्छानिवृत्ती कशी घेणार? असा प्रश्न वयाची पन्नाशी ओलांडलेल्या एसटी महामंडळातील देवीदास कोळेकर यांच्यासह अनेकांनी केला आहे.
कोरोनामुळे मध्यंतरी लालपरी जागेवर थांबली होती. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचा मोठा प्रश्न महामंडळासमोर उभा राहिला होता. सध्या बससेवा जिल्ह्यात पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे; परंतु अधिकारी, कर्मचारी कमी करण्यासाठी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे; परंतु महामंडळातील कर्मचाऱ्यांना प्रारंभी अल्पसा पगार असतो. त्यामुळे मुलांचे शिक्षण करून स्वत:चे घर त्यांना घेता येत नाही. देवीदास कोळेकर म्हणाले, कुटुंबात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असे आम्ही पाच जण आहोत. सध्या मुला- मुलींचे शिक्षण सुरू आहे. कुटुंबासाठी महिन्याला २० हजार रुपये खर्च होतात. होम लोनचे १० हजार तर पीएफचे १० हजार रुपये कटतात. त्यामुळे सध्याच ओढाताण करून घर चालवावे लागते. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन घर खर्च भागविणे मोठे जिकिरीचे आहे.
स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?
एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना सेवानिवृत्तीसाठी शिल्लक असलेल्या वर्षासाठी प्रतिवर्ष तीन महिन्यांचा पगार मोफत दिला जाणार आहे. यासोबतच सेवानिवृत्तीनंतर ज्या योजनांचे लाभ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळतात, ते सर्व लाभ सध्या स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर दिले जाणार आहेत, (उदा. पीएफ एक रकमी मिळेल.) अशी माहिती एस.टी. महामंडळाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
घर खर्चासाठी ओढाताण
मला सध्या ४० हजार रुपये पगार मिळतो. यात घराच्या कर्जासह पीएफसाठी २० हजार रुपये जातात. उर्वरित पैशातून घर खर्च भागविण्यासाठी सध्या मोठी ओढाताण करावी लागत आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती योजना परवडणारी नाही.
- देवीदास कोळेकर, मेकॅनिक
दोन मागण्या प्रमुख
स्वेच्छानिवृत्ती योजनेला आमचा विरोध नाही; परंतु महामंडळाने वर्षाला तीन महिन्यांऐवजी सहा महिन्यांचा पगार द्यावा. यासोबतच एक पाल्य नोकरीसाठी घ्यावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
- प्रकाश कर्वे, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना.