लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी १२ ते ६ वाजण्याच्या शहरातील व्यंकटेश नगर मध्ये शिवसिंग रामसिंग जोनवाल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम ६० हजार रुपये असा एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.जाफराबाद येथील शिवसिंग जोनवाल हे शेतीच्या कामानिमित्त मंगळवारी गोकुळवाडी येथे गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली. दुसऱ्या ठिकाणी सह्याद्री पार्कमध्ये माजी सैनिक सुभाष हिवाळे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे आठवडी बाजाराच्या दिवशीच या घटना घडत आहेत.गेल्या दहा दिवसांपूर्वी आदर्श नगरमध्ये अशीच दिवसा चोरीची घटना घडली होती. आता परत ही दुसरी घटना भरदिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसिंग जोनवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे करीत आहेत.
जाफराबादमध्ये भर दिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:39 IST