Holidays jam due to consecutive vacations .. | सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..
सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आधीच उल्हास आणि त्यात सलग सुट्यांचा सुकाळ यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि बच्चे कंपनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु या सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
जालना जिल्ह्यात यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध विभागांमध्ये जवळपास दोनशेपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाज ढेपाळले आहे. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी हे औरंगाबाद, परभणी येथून अप-डाऊन करीत असल्याने जालन्यातील कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालतात. जिल्ह्यातील तालुक्यांच्या मुख्यालयी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची मानसिकता नाही. याचा परिणाम कामकाजावर पडत आहे.
१ ते १५ आॅगस्ट दरम्यान, सरासरी सहा सुट्या आल्या आहेत. त्यातच काही सुट्या या सलग आल्या असल्याने अनेकांनी शुक्रवारी किरकोळ रजा टाकून गुरुवार ते रविवार असा सुटीचा आनंद घेतला.
जिल्ह्यातील मुख्यालयांमध्ये सोमवार आणि शुक्रवार या दिवशी अधिकाºयांनी दौरे करू नयेत, असे निर्देश आहेत. परंतु आठवड्यातील फार क्वचित वेळेस संबंधित विभागाचे अधिकारी ज्या नागरिकांचे त्या विभागात काम आहे, तेथे उपलब्ध होतात. यामुळे सर्वसामान्यांची घोर निराशा होत आहे.
एकूणच जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख, पाटबंधारे, जिल्हा परिषदेतील विविध विभाग तसेच पंचायत समिती, जीवन प्राधिकरण, शासकीय ग्रंथालय आदी विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाºयांची भेट होणे म्हणजे एक प्रकारचा दुर्मिळ योग असल्याचे मानले जाते.
पंचनामा करूनही जैसे थे...
जालना शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी नसल्याची तक्रार यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष होते.
यापूर्वी देखील अनेक विभागांचा थेट तहसीलच्या अधिकारी कर्मचाºयांना सोबत घेऊन पंचनामा केला. परंतु त्यालाही कर्मचारी जुमानत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंनीच लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी केली.


Web Title: Holidays jam due to consecutive vacations ..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.