ख्रिसमससह सलग तीन सुट्या, शासकीय कार्यालयात सोमवारही आरामाचाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:31+5:302020-12-29T04:29:31+5:30
राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळही बदलण्यात आली आहे. सर्व कर्मचारी व ...

ख्रिसमससह सलग तीन सुट्या, शासकीय कार्यालयात सोमवारही आरामाचाच !
राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळही बदलण्यात आली आहे. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ करण्यात आली. परंतु, राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासनाने कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूट दिली होती. आता सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. असे असतानाही बहुतांश अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत.
शासकीय कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत सुटी होती. सोमवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर हजर राहणे गरजेचे होते. यासाठी आमच्या प्रतिनिधींनी जालना जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाहणी केली असता, प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्यासह २० कर्मचारीच वेळेवर आले. यात शिक्षण विभाग ३, आरोग्य विभाग ६, माध्यमिक शिक्षण विभाग २, बांधकाम ३, पशुसंवर्धन १, कृषी ०, पाणीपुरवठा ०, सामान्य प्रशासन ४, पंचायत विभागाचे दोन कर्मचारी वेळेवर हजर राहिले. अधिकारी व कर्मचारी उशिरा आल्यानंतरही त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.
हे अधिकारी आले उशिरा
कार्यकारी अभियंता डाकोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, पशुसंवर्धन अधिकारी कांबळे.