जवखेडा येथे ग्रामस्थांनी केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:24+5:302021-03-31T04:30:24+5:30

राजूर : होळीच्या दिवशी वाईट विचार, वाईट सवयी व वाईट प्रथांचे दहन केले जाते. यावर्षी भोकरदन तालुक्यातील जवखेडा (पवार) ...

Holi of tobacco products made by the villagers at Javkheda | जवखेडा येथे ग्रामस्थांनी केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी

जवखेडा येथे ग्रामस्थांनी केली तंबाखूजन्य पदार्थांची होळी

राजूर : होळीच्या दिवशी वाईट विचार, वाईट सवयी व वाईट प्रथांचे दहन केले जाते. यावर्षी भोकरदन तालुक्यातील जवखेडा (पवार) येथील युवकांनी आगळीवेगळी होळी साजरी केली. व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत असल्याने ग्रामस्थांनी तंबाखूजन्य पदार्थांची होळी करून गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला.

जवखेडा (पवार) हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील प्रत्येक घरातील तरुण सैन्यात भरती झालेला आहे. बॉर्डरवर प्रतिकूल परिस्थितीतही देशभक्तीचा जलवा दाखवत देशसेवेचे कर्तव्य निभावत आहे. सुटीत जवान गावी आले की, वृक्षारोपण, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन ते गावातील तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करतात. या अगोदरही गावातील ज्येष्ठ सैनिक कैलास पवार, काकासाहेब पवार, संतोष पवार यांनी दारूबंदीसंदर्भात अभियान राबवून गाव नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता. अलीकडच्या काळात गावातील व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब बनली आहे. म्हणून गावातील तरुणांनी होळीच्या दिवशी व्यसनमुक्तीचा निर्धार केला. सचिन पवार, सुधीर तंगे, अतुल पवार, अशोक पवार, अनिल खरात, ज्ञानेश्वर पवार या तरुणांनी पुढाकार घेऊन गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, किराणा व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संवाद साधून गाव व्यसनमुक्त करण्याची संकल्पना मांडली. त्यास ग्रामस्थांकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला. होळीच्या दिवशी तरुणांनी सर्व किराणा व्यावसायिकांच्या दुकानातील विडी, सिगारेट, गुटखा जमा करून ग्रामस्थांच्या साक्षीने तंबाखूजन्य पदार्थांचे होळीत दहन केले. यावेळी कृष्णा पवार, विठ्ठल खरात, कुंडलिक पवार, अशोक पवार, ज्ञानेश्वर पवार, सचिन पवार, अतुल पवार, सुधीर तंगे, अनिल खरात, रामेश्वर पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. जवखेड्यात युवकांनी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा

तरुण हेच गावाचे आधारस्तंभ असून, सर्वांगीण विकासासाठी गाव स्वच्छ व निरोगी ठेवणे आवश्यक असल्याचे मत अशोक पवार यांनी व्यक्त केले. बाल संस्कार केंद्र व योग शिक्षणाच्या माध्यमातून व्यसनापासून दूर राहता येते. त्यासाठी तरुणांनी योग शिक्षणाकडे वळावे, असे मत योग शिक्षक अतुल पवार यांनी व्यक्त केले.

होळीच्या साक्षीने युवकांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.

गावातील तरुणांनी व्यसनमुक्तीची संकल्पना मांडली. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, त्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव पास करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. चांगल्या कामासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सहकार्य मिळेल.

-कुंडलिक पवार, सरपंच, जवखेडा (पवार)

गावामुळेच आपली ओळख निर्माण होते. गावाच्या भल्यासाठी माझ्या दुकानातून एकाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही. गावासाठी तेवढा तोटा सहन करण्याची माझी तयारी आहे. इतरांनीही या उपक्रमास सहकार्य करावे.

-अशोक पवार, किराणा व्यावसायिक

तरुणांना व्यसनांच्या दुष्परिणामाची जाणीव करून द्यावी. बालमनावर संस्कार केले की, मुले व्यसनाधीनतेकडे वळत नाहीत. शालेय जीवनातच व्यसनमुक्तीचे संस्कार होणे गरजेचे आहे.

-‌सचिन पवार, युवक कार्यकर्ता

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वडिलांना कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तेव्हापासून माझे कुटुंब अस्वस्थ आहे. अशी वेळ इतरांवर येऊ नये म्हणून गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला.

-सुधीर तंगे, सैनिक

Web Title: Holi of tobacco products made by the villagers at Javkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.