डोक्याला मार तरी १९ कि.मी चालविली दुचाकी; उपचारासाठी औरंगाबाद येथे जाताना मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:27+5:302021-01-13T05:20:27+5:30
फकिरा देशमुख भोकरदन : शेतीच्या वादातून काका व चुलत भावांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर कौतिक गावंडे यांनी कशीबशी सुटका ...

डोक्याला मार तरी १९ कि.मी चालविली दुचाकी; उपचारासाठी औरंगाबाद येथे जाताना मृत्यू
फकिरा देशमुख
भोकरदन : शेतीच्या वादातून काका व चुलत भावांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर कौतिक गावंडे यांनी कशीबशी सुटका करून १९ किलोमीटर दुचाकी चालवीत भोकरदन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी उपचारासाठी पाठविले. उपचार घेऊन पुन्हा पोलीस ठाणे गाठले; परंतु तक्रार करून औरंगाबाद येथे जात असताना काळाने घाला घातल्याने गावंडे यांचा मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शनिवारी सायंकाळी घडली.
कोळेगाव येथील गावंडे कुटुंबात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शेतीच्या वादातून भांडण सुरू होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कौतिक गावंडे हे गोद्री रोडवरील गट क्रमांक १९५ मधील गव्हाच्या पिकाला पाणी देत होते. त्याचवेळी काका सुखदेव सारजूबा गावंडे व चुलत भाऊ सुधाकर गावंडे, परमेश्वर गावंडे हे त्यांच्याकडे गेले व तू आमच्याकडे रागाने का बघतोस म्हणत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी डोक्यात फावडे व दगड मारून डोके फोडले. त्यांनी आरोपींच्या तावडीतून सुटका करून डोक्याला मार लागलेला असतानाही १९ किलोमीटर दुचाकी चालवून भोकरदन पोलीस ठाणे गाठले. पोलीस कर्मचारी श्रीकांत केंद्रे यांनी गावंडे यांना रुग्णालयात पाठविले. भोकरदन येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना जालना येथे रेफर केले; परंतु गावंडे हे जालना येथे न जाता सिल्लोड येथे गेले. उपचार घेऊन त्यांनी रग्णवाहिकेने रात्री १० वाजता पुन्हा भोकरदन पोलीस ठाणे गाठले. तक्रार देताना त्यांना उलटी झाली. पोलिसांनी त्यांना औरंगाबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. औरंगाबादकडे जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री कोळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले. तीनपैकी एक आरोपी सुखदेव गावंडे हे सुद्धा जखमी असल्याने त्यांच्यावर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पगार मिळण्यापूर्वीच खून
कौतिक गावंडे यांना दोन भाऊ आहेत. एक भाऊ भोकरदन येथे राहतो, तर दुसरा पुण्यात वास्तव्याला आहे. गावंडे ११ वर्षांपासून जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील एका खासगी संस्थेवर कार्यरत होते. त्यांना पगार सुरू नव्हता. काही दिवसांपूर्वीच त्यांना २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. त्यांना पगारही सुरू होणार होता; परंतु पगार मिळण्यापूर्वीच त्यांचा खून झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.