‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:34 IST2019-12-29T00:32:29+5:302019-12-29T00:34:24+5:30
मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात
परतूर : मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
पानीपत युध्दाची बरीच खलबते व युध्दाची रणानिती परतूर येथे सैन्य मुक्कामी असताना शिजली होती. पानीपतच्या तिसऱ्या लढाईसाठी १४ मार्च १७६० रोजी परतूर हून सैन्याची आगेकूच झाली होती. ४५ हजार सैन्याचा फौजफाटा व सरसेनापती भाऊसाहेब पेशवे, इब्राहीम गारदीसह शूर मराठे सरदार हे परतूर मुक्कामी होते. या मुक्कामीच या पानीपत युध्दाची बरीच खलबते शिजली होती. याच ठिकाणी सैन्याजवळ अपुरा पैसा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच मुक्कमी नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव पेशवे यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व देण्यात आले. शहराच्या पश्चिम दिशेला असलेले ऐतिहासिक नृसिंह मंदिर, लिंगायत समाजाचे मठ, शहापी बोधले परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानावर या सैन्याचा मुक्काम झाला होता.
परतूरचे हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता शौर्ययात्रा, पानीपत यात्री एक दिवस मुद्दाम परतूर मुक्कामी येऊन दुसºया दिवशी पानीपतकडे आगेकूच करणार आहे. पानीपत हा मराठ्यांचा धगधगता इतिहास आहे. हा इतिहास जागृत व्हावा व नवीन पिढीला माहिती मिळावी म्हणून कोल्हापूर ते पानीपत ही शौर्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मराठे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने नेण्यात येत आहे. या यात्रेचे कोल्हापूर येथून प्रयाण होत आहे. ज्या ठिकाणी पानीपत युध्दासाठी सैन्याचे पाडाव पडले. त्या ठिकाणी इतिहासकार माहिती देणार आहेत.
शौर्याचा इतिहास जागा होईल
या शौर्य यात्रेच्या मुक्कामाने युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळेल. सैन्याचे शौर्य हे आजच्या युवकांपुढे यायला पाहिजे. त्यांना इतिहास कळायला पाहिजे. हाच हेतू या यात्रेचा आहे. तसेच तज्ज्ञ इतिहासकारांचे व्याख्यानही यावेळी होणार असल्याचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी सांगितले.
युध्दाच्या आठवणी
उदगीर- परतूर- बुºहाणपूर- देवास- गुणा- गव्हालेर- कुरूक्षेत्र- पानीपत या ठिकाणी या यात्रेचे पडाव पडणार आहेत. पानीपत युध्दात विरगती प्राप्त झालेल्या ६० हजार मराठा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी १४ जानेवारी २०२० रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच या शौर्ययात्रेने पानीपत युध्दाच्या आठवणी जाग्या होण्याबरोबरच परतूरच्या इतिहासाला उजाळा मिळेल.