महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:44+5:302021-02-25T04:37:44+5:30
जालना : सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागतात. पैशांच्या मोहापायी ते सर्वसामान्यांकडून लाचेची ...

महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक
जालना : सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागतात. पैशांच्या मोहापायी ते सर्वसामान्यांकडून लाचेची मागणी करतात. असाच पैशांचा मोह न आवरणारे ६८ जण तीन वर्षांत लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. यात ५१ ते ६० वर्षे वयोगट असलेल्या २६ लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
लाच घेणाऱ्यांमध्ये महसूल व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी अग्रेसर आहेत. मागील तीन वर्षांत महसूल खात्यातील १२ तर पोलीस खात्यातील ९ जण लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद कार्यालयाचा क्रमांक लागतो. मागील काही दिवसांपासून पैसे घेऊन कामे करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लाच घेताना अनेक जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
मागील तीन वर्षांत आम्ही ५१ ते ६० वयोगटातील २६ जणांना लाच स्वीकारताना अटक केली आहे. त्यातच ३० वर्षांच्या आतील आरोपींचीही संख्या वाढली आहे. हे कारवायांवरून दिसून येत आहे. परंतु, आरोपी कोणताही असो, तक्रार आली की, त्याला ताब्यात घेतले जाईल. मागील तीन वर्षांत एसीबीने तब्बल ६८ लोकांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सुरूच राहील.
- रवींद्र निकाळजे, उपपोलीस अधीक्षक, जालना
उतरत्या वयातील सरकारी बाबूंना सर्वाधिक पैशाचा मोह
जालना येथील लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत ५१ ते ६० वयातील सर्वाधिक सरकारी बाबूंनी तीन वर्षांत लाच स्वीकारली आहे. २०१९ मध्ये उतरत्या वयातील १४ जणांनी लाच घेतली.
तर २०२० मध्ये १२ जणांना बेड्या ठोकल्या. २०२१ मध्ये एकाही व्यक्तीने लाच स्वीकारली नाही. त्यानंतर ३१ ते ४० वयोगटातील सरकारी बाबू लाचेची मागणी करतात. या वयोगटातील तब्बल १९ जणांली लाच स्वीकारली आहे.
सध्या शासकीय नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. अशा स्थितीतही कठोर परिश्रम घेऊन तरुण सरकारी खुर्चीवर बसतात. आपण चांगले काम करून, सामान्यांची सेवा करण्यासह प्रामाणिक कर्तव्य बजावण्याचे ध्येय खुर्चीवर बसण्यापूर्वी ठेवतात. परंतु, त्यांना पैशांचा मोह आवरत नाही.
सरकारी अधिकारी थेट स्वत: लाच स्वीकारत नाहीत. लाचेची मागणी करून ते वसुलीसाठी खासगी लोकांचा आधार घेतात. सरकारी बाबूंची वसुली करणाऱ्या लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.