जिल्ह्यात दमदार पाऊस, १६ महसूल मंडळात ढगफुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:38+5:302021-09-06T04:34:38+5:30

जालना : जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी रात्रभर दमदार पाऊस झाला. जिल्हाभरात सोमवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यात रविवारी ...

Heavy rains in the district, clouds in 16 revenue boards | जिल्ह्यात दमदार पाऊस, १६ महसूल मंडळात ढगफुटी

जिल्ह्यात दमदार पाऊस, १६ महसूल मंडळात ढगफुटी

जालना : जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी रात्रभर दमदार पाऊस झाला. जिल्हाभरात सोमवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ६१.७० मिमी पाऊस झाला असून, ३९ पैकी १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक अंबड तालुक्यात तब्बल १२२.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या ढगफुटीमुळे ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आला असून, अनेक गावांचाही संपर्क तुटला आहे.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात मागील २४ तासात ६१.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अंबड तालुक्यात १२२.३० मिमी झाला. घनसावंगी तालुक्यात ८२.४० मिमी, जालना तालुक्यात ८१.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बदनापूर तालुक्यात ३९.५० मिमी, भोकरदन तालुक्यात ३७.७० मिमी, जाफराबाद तालुक्यात ३६.९० मिमी, परतूर २५.४० मिमी तर मंठा तालुक्यात ३०.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंबड तालुक्यातील विविध गावात झालेल्या पावसामुळे गोदावरीसह इतर नद्या दुथडी वाहत होत्या. घनसावंगी तालुक्यातील अंतरवाला टेंभी येथून वाहणाऱ्या नरोळा नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी अर्ध्याहून अधिक गावांत शिरले होते. अचानक गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. यापूर्वी झालेल्या पावसात वाहून गेलेल्या तीर्थपुरी ते कुंभार पिंपळगाव मार्गावरील पुलाची डागडुजी केली जात होती. परंतु, रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे हा पूल पुन्हा पाण्यात वाहून गेला आहे. परिणामी या भागातील असंख्य गावांचा संपर्क तुटला होता.

जिल्ह्यात १२७ टक्के पाऊस

जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६०३.१० मिमी असून, आजवर ७०६.७० मिमी म्हणजे १२७.३१ टक्के पाऊस झाला आहे. जालना तालुक्यात ११९.५२ टक्के, बदनापूर- ११६.१९ टक्के, भोकरदन- १२२.६९ टक्के, जाफराबाद ११२.३५ टक्के, परतूर तालुक्यात १२३.५४ टक्के, मंठा- ११.५० टक्के, अंबड तालुक्यात १४७.४९ टक्के तर घनसावंगी तालुक्यात १३७.१७ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे.

या मंडळात झाली अतिवृष्टी

जिल्ह्यातील १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यात जालना ग्रामीणमध्ये ९५.२६ मिमी, विरेगाव ७४.७५ मिमी, रामनगर मंडळात १२९.७ मिमी, पाचनवडगाव मंडळात १८३.२ मिमी पाऊस झाला आहे. अंबड तालुक्यातील अंबड मंडळात ११६.७५ मिमी, धनगरपिंपरी महसूल मंडळात ११६.२५ मिमी, जामखेड मंडळात ११७ मिमी, रोहिलागड मंडळात ११९.५० मिमी, गोंदी मंडळात १२७.५ मिमी, वडीगोद्री मंडळात १३४.५० मिमी तर सुखापुरी मंडळात १२४.५० मिमी पाऊस झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी मंडळात ९४.५० मिमी, घनसावंगी ग्रामीण ९५.७५, तीर्थपुरी- १२२ मिमी, अंतरवाली १०७.५० मिमी तर रांजणी मंडळात ६६.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Heavy rains in the district, clouds in 16 revenue boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.