आरोग्य उपकेंद्र बनले शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:23+5:302021-09-07T04:36:23+5:30
हिसोडा : भोकरदन तालुक्यातील हिसोडा बु. येथील आरोग्य उपकेंद्र हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. यामुळे आरोग्य केंद्राची इमारत ...

आरोग्य उपकेंद्र बनले शोभेची वस्तू
हिसोडा : भोकरदन तालुक्यातील हिसोडा बु. येथील आरोग्य उपकेंद्र हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. यामुळे आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. परिणामी, रुग्णांची गैरसोय होत असून, खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.
हिसोडा गावाची लोकसंख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे. हिसोडा खु., हिसोडा बु., कोठाकोळी, करंजगाव या गावांतील नागरिकांसाठी हिसोडा येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्रासाठी सुसज्ज अशी इमारतही बांधण्यात आली होती; परंतु याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने हे उपकेंद्र दहा वर्षांपासून बंद होते. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली होती. उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या नागरिकांना इतरत्र उपचारासाठी जावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर उपकेंद्र सुरू करण्यात आले होते. तीन ते चार महिने उपकेंद्र सुरू होते; परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा उपकेंद्र बंद करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. खासगी दवाखान्यात जास्तीचे पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत. याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष देऊन तातडीने उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासन हे नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. दुसरीकडे मात्र हिसोडा येथील उपकेंद्र बंद ठेवून रुग्णांच्या जिवाशी खेळले जात आहे. रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक ही पदे रिक्त आहेत. सध्या वातावरणातील बदलामुळे परिसरात सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असे असतानाही आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात नाही.
रिक्त पदे व सध्या कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याने उपकेंद्र बंद राहत आहे. येथे असलेली औषधी आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या माध्यमातून रुग्णांना दिली जात आहे. कर्मचारी कमी असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रिक्तपदांबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे.
डॉ. हर्षल महाजन, वैद्यकीय अधिकारी, जळगाव सपकाळ