बायकोला भेटायला जाण्यासाठी हवाय ई-पास ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:01+5:302021-06-10T04:21:01+5:30
जालना : कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला ...

बायकोला भेटायला जाण्यासाठी हवाय ई-पास ?
जालना : कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला आहे. मात्र, ई-पास घेताना काही नागरिक अफलातून कारणे देत आहेत. मला माझ्या बायकोला भेटायला जायचं आहे, यासाठी मला ई-पास हवाय, मला लग्नाला जायचं आहे आदी कारणे ई-पास घेताना दिली जात आहेत.
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. अशीच स्थिती राज्यभरात होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत होते, तर दुसरीकडे अंत्यसंस्कार, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने ई-पास देण्यास सुरुवात केली होती. दवाखाना, अंत्यविधी यासह अत्यावश्यक सेवेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ऑनलाइन अर्ज करून ई-पास मिळविला जात होता. मात्र, ई-पास घेताना काही नागरिक केवळ गंमत म्हणून ऑनलाइन अर्ज करून वेगवेगळी कारणे देत होते.
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी ?
जिल्ह्यात मागील एक ते दीड महिन्यात तब्बल ४२ हजार १२७ जणांनी ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज केला आहेत. त्यापैकी २० हजार १२६ जणांनी दवाखान्यात, अंत्यविधीला जाण्याची कारणे सांगितली. काही जणांनी तर चार ते पाच वर्षांपूर्वीचे तपासणीची कागदपत्रे दाखवून आता मला तपासणीसाठी जायचे आहे, असे सांगून ई-पास मिळविण्यासाठी प्रयत्न केला. सर्वांनाच मेडिकल इमर्जन्सी कशी काय, असा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
मार्च २०२० पासून घरात कोंडून असणाऱ्या नागरिकांना आता बाहेर पडण्याची उत्सुकता आहे. यासाठी बायकोला भेटायला जाण्याचा अनेकांनी बेत केला. शिवाय, सहलीवर जाण्याचा अनेकांनी बेत केला.
बहुतांश अर्जांत वैद्यकीय कारण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ जवळच्या नातेवाइकांचे लग्न, अंत्यविधीचे कारण देण्यात आले आहे, तर २५ हजार ०२५ जणांचे नाकारण्यात आलेल्या अर्जात अफलातून कारणे देण्यात आली आहेत.
नातेवाइकांची सहज भेट, कारण नसताना प्रवास, याशिवाय लग्नानंतर फिरायला जाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे, तर काहींनी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्याचे आढळून आले आहे.
ज्यांना खरच गरज होती, त्यांना दिले पास
ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपले अर्ज दाखल केले होते. या अर्जांची पाहणी व छाननी केल्यानंतर अनेक अर्जांत त्रुटी असल्याचे आढळून आले. दरम्यान, अनेकांनी अत्यावश्यक वगळता सुमार कारणे नोंद केली आहेत. काहींनी फिरायला जायचे आहे, अशीही नोंद केली आहे. परिणामी, अनेक अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असल्यास त्याला मंजूर करण्यात आले आहे.
विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना