हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST2021-08-18T04:35:49+5:302021-08-18T04:35:49+5:30
जालना : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे हॉटेल चालकांनाही निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. शहरातील काही जागरूक हॉटेल चालकांनी स्वत:सह ...

हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?
जालना : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे हॉटेल चालकांनाही निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. शहरातील काही जागरूक हॉटेल चालकांनी स्वत:सह कामगारांचे लसीकरण करून घेतले आहे; परंतु काही हॉटेल चालकांसह कामगारांचेही लसीकरण झाले नसल्याचे चित्र मंगळवारी शहरात केलेल्या पाहणीत दिसून आले.
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच लसीकरणही वेळेत पूर्ण होण्याची गरज आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे हॉटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. दैनंदिन हजारो ग्राहक येणाऱ्या शहरातील काही हॉटेल चालकांसह कामगारांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नाहीत. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेऊन संबंधितांच्या लसीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी !
हॉटेल १
शहरातील अंबड चौफुली परिसरातील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील तिघांनी लस घेतली नव्हती, तर इतर दोघांनी पहिला डोस घेतला होता.
हॉटेल २
मंठा चौफुलीच्या पुढील भागातील एका हॉटेलमध्ये चालकाने डोस घेतल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांपैकी काहींनी घेतला आहे, तर काहींनी घ्यावा म्हणून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
रस्त्यांवर टपऱ्यांवर आनंदीआनंद
शहरातील बसस्थानक असो अथवा बाजारपेठ असो सर्वच मार्गांवर हॉटेलच्या टपऱ्या दिसून येतात.
या टपऱ्यांमध्ये चहाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
विशेषत: ग्रामीण भागातील अनेक नागरिक येथे येतात;
परंतु या हॉटेल चालकांसह तेथील एक-दोन कामगारांचे लसीकरण झाले का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सर्वांचे लसीकरण व्हावे याला आमचे प्राधान्य
कोरोनातील निर्बंधांमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आता कुठे काहीशी सूट मिळाली आहे. आम्ही सूचनांचे पालन करून व्यवसाय करीत आहोत. शिवाय कोरोना प्रतिबंधक लस सर्व हॉटेल चालकांसह कामगारांनी घ्यावी, याला प्राधान्य दिले आहे.
- मोहन इंगळे, हॉटेल चालक
लसीकरण करून घेण्याबाबत सूचना
शहरातील हॉटेल व्यावसायिकच नव्हे तर सर्वच व्यावसायिक, नागरिकांनी, कामगारांनी वेळेत लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. हॉटेल चालक, कामगारांच्या लसीकरणाच्या आढाव्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल.
- श्रीकांत भुजबळ, तहसीलदार