आन्वा, वाकडी परिसरात गुटखा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:10+5:302021-04-04T04:31:10+5:30
मुटकुळे यांचा सत्कार जालना : येथील पाटंबधारे विभागातील कर्मचारी ब्रदीनाथ मुटकुळे हे ३१ मार्च २०२१ रोजी निवृत्त झाले. ...

आन्वा, वाकडी परिसरात गुटखा विक्री
मुटकुळे यांचा सत्कार
जालना : येथील पाटंबधारे विभागातील कर्मचारी ब्रदीनाथ मुटकुळे हे ३१ मार्च २०२१ रोजी निवृत्त झाले. नोकरीदरम्यान मुटकुळे यांनी विविध ठिकाणी सेवा बजावली. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जळगाव येथे अखंड स्वच्छता अभियान
जालना : जालना तालुक्यातील जळगाव- ब्राह्मणखेडा येथे १५ मार्चपासून अखंड संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर तौर, मुरलीधर थेटे, लक्ष्मण शिंदे, प्रल्हाद दांडाईत, सोनाजी भुतेकर, बाबासाहेब ढोले, सोनाजी भुतेकर, ज्ञानेश्वर आर्दड, विलास हानवते, गजानन ढोले, सुखदेव चाळगे, बाबूराव थेटे आदींची उपस्थिती होती.
जालन्याच्या भार्गवी दत्तात्रय मुळे हिचे यश
जालना : ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’अंतर्गत दहावी व बारावीमध्ये पहिल्या दहा येणाऱ्या विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. यात जालन्याच्या भार्गवी दत्तात्रय मुळे हिची निवड झाली आहे. जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ५ एप्रिल रोजी तिचा गौरव केला जाणार आहे. या यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.
पुलांच्या कठड्यांना रंग देण्याचे काम सुरू
जालना : शहरातील विविध गावांतून समृद्धी महामार्ग जात आहे. या महामार्गावर असलेल्या काही ठिकाणी पुलांची कामे झाली आहेत. १ मेपासून या रस्त्यावरून नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतूक होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जालना शहरातून जाणाऱ्या मार्गाचे बहुतांश ठिकाणी काम झाले आहे. आता ज्याठिकाणी काम झाले आहे, त्या पुलांना रंग देण्याचे काम सुरू आहे.
गोंदेगाव येथे ग्रामस्थांची कोरोना चाचणी
जालना : जालना तालुक्यातील गोंदेगाव उपकेंद्र व ग्रामपंचायतीच्या वतीने ३० नागरिकांची ग्रामस्थांची शनिवारी अँटिजन टेस्ट करण्यात आली. याप्रसंगी बद्रीनाथ वाघ, डॉ. कैलास हारकळ, शेळके यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
तीन विद्यार्थिनींची पुरस्कारसाठी निवड
जालना : ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’अंतर्गत दहावी व बारावीमध्ये पहिल्या दहा येणाऱ्या विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. यासाठी राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील शुभांगी खरात, पूजा घेंबड, रिद्धी तांगडे यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक मनीष अग्रवाल, उपमुख्याध्यापक जी.एम. दशरथ व पर्यवेक्षक एल.सी. मुळे यांनी कौतुक केले.
सेवानिवृत्तीनिमित्त पाटील यांचा सत्कार
परतूर : येथील भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेले वासुदेव आनंदराव पाटील हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने कार्यालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. कार्यालयाचे उपअधीक्षक सी.ए. सेवक यांच्या हस्ते पाटील यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एस.बी. गिरी, तुकाराम उबाळे, आर.ई. कदम हे उपस्थित होते.
शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जालना : जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुरेश अण्णा कदम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेश कदम, पी.आर. काळे, समता शिक्षक संघाचे जिल्हा सचिव परमेश्वर काळे, भीमराव, नफिसा बाजी, गौतम गवई, अशोक चावरे आदींची उपस्थिती होती.
साडीने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
जालना : किरायाच्या घरात राहणाऱ्या तरुणाने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता जालना शहरातील शकुंतलानगर भागात उघडकीस आली. प्रवीण श्रीराम राठोड (लोणार, जि. बुलडाणा), असे मृत तरुणाचे नाव आहे. हा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. दुर्गंधी येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कानोसा घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका
भोकरदन : तालुक्यातील राजूर ते फुलंब्री मार्गावरील नाल्याच्या जवळ मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय इतर काही ठिकाणीही हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी राजूर ते फुलंब्री मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिक, वाहनचालकांसह प्रवाशांमधून केली जात आहे.