बांधावर जाऊन कृषी विभागाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:08+5:302021-01-08T05:41:08+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका पारध : गतवर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून पारध (ता. भोकरदन) परिसरातील ...

बांधावर जाऊन कृषी विभागाचे मार्गदर्शन
शेतकऱ्यांना दिलासा : बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका
पारध : गतवर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून पारध (ता. भोकरदन) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सध्या पिकेही चांगली आली आहेत; परंतु मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगराई पडली आहे. शेतकऱ्यांमधून होणारी मागणी पाहता आता कृषी विभागाच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई मंडळात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
यात शेतकऱ्यांना अळीला नियंत्रणात आणण्यासाठीच्या राबवायच्या उपाय- योजना याविषयी माहिती देण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले. गतवर्षी पारध परिसरातील शेतकऱ्यांना खरिपात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही; परंतु पाऊस अधिकचा झाल्याने लघु- मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, नदी, नाले, विहीर बोअर यांची पाणी पातळी मोठी वाढली होती. या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरासह इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या गव्हाला ओंब्या आल्या असून, हरभऱ्याला देखील काही ठिकाणी घाटे लागले आहेत. असे असताना मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. याचा परिणाम पिकांवर रोगराई पडण्यावर झाला आहे. रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या ओषधांची पिकांवर फवारणी करीत आहेत; परंतु रोगराई अटोक्यात येत नाही.
एक एकर गहू, हरभरा याची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांचा खर्च येत आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. या मागणीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यात पिकांवरील रोगराई अटोक्यात आणण्यासाठी राबवायच्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत.
चौकट
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात बुधवारी तालुका कृषी अधिकारी भुते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी जवस, ओवा, बडीशेप या आंतर पिकांकडेही लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. या पथकात कृषी सहायक मोहित पवार, रामेश्वर काळे आदींचा सहभाग होता.
फोटो ओळ : पिंपळगाव रेणुकाई मंडळात शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी मार्गदर्शन केले.