शहरात कार्यक्रम
जालना : जागतिक बालकामगार विरोधीदिनानिमित्त नुकतेच ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्त शहरासह जिल्ह्यातील सर्व कामगार, दुकाने, हॉटेलसह इतर संस्थांनी चौदा ते अठरा वर्षांखालील बाल कामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे.
अंगणवाडीच्या भिंती झाल्या बोलक्या
अंबड : तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने अंगणवाडीचे रूप पालटले आहे. रंगरंगोटीमुळे अंगणवाडीच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. आलमगाव येथे दोन अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांची रंगरंगोटी, सजावट व भिंतीवर विविध पाळीव प्राणी, पक्षी, झाडे, भाज्या पळे, खेळाची चित्रे काढून भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.
बाळासाहेब लुंगाडे यांची निवड
जालना : जालना तालुक्यातील हिवर्डी येथील रहिवासी प्रा. बाळासाहेब लुंगाडे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे, डॉ. निसार देशमुख, दिलीप भुतेकर, प्रा. डॉ. गणेश भुतेकर, प्रा. विनोद जाधव, प्रा. रमेश भुतेकर, रमेश यज्ञेकर-जोशी, भगवान नाईकनवरे आदींनी स्वागत केले.
बियाण्यासह खते खरेदीसाठी गर्दी
जालना : शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, रविवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. मागील आठवड्यापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून, या पावसामुळे शेतातील ओलावा कमी झाला नाही.
जेसीबीच्या धडकेत एक ठार
बदनापूर : अंबडगाव शिवारातील शेतात जेसीबी यंत्राची धडक लागल्याने एकजण ठार झाला आहे. या प्रकरणी जेसीबी चालकाविरूध्द रविवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शेख डिगंबर अवचार (वय ५०) यांचा मृत्यू झाला. जेसीबीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. पुढील तपास विजय राठोड करीत आहेत.
पेरणीला वेग
मंठा : तालुक्यात रविवारी पहाटे दमदार पावसामुळे नूरच पालटला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी पेरणीच्या तयारीची लगबग सुरू आहे. जमिनीची वाफसा होताच मंठा तालुक्यात पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.
कोरोना योध्द्यांचा सत्कार
मंठा : युवासेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या उपस्थितीत कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष वरकड, प्रल्हाद बोराडे, नितीन राठोड, श्रीरंग खरात, डिगांबर बोराडे, श्रीरंग खरात, बाबाराव राठोड, बाळासाहेब बोराडे हे हजर होते.