हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:25+5:302021-09-06T04:34:25+5:30
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, त्यातच शनिवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी ...

हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, त्यातच शनिवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले. जोमात आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. असे असेल, तरी तालुक्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले आहे.
घनसावंगी तालुक्यातील गंगा व दुधना दोन्ही प्रमुख नद्यावरील प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरले आहे. नदी, नाले, ओढे ही दुथडी भरून वाहत आहेत. घनसावंगी तालुक्यातील सर्व मंडळात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. चार तास झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऊस, बाजरी व मक्याचे उभे पीक जमीनदोस्त झाले, तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर ही पिके जागीच सडून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.
तालुक्यातील सातही मंडळांत जोरदार पाऊस झला. सर्वाधिक १६१.५ मिमी पाऊस तीर्थपुरी मंडळात झाला. त्या खालोखाल आंतरवाली मंडळात १५३.८ मिमी, राणी उंचेगाव ११८.१ मिमी, घनसावंगी १०९.४ मिमी, रांजणी ९४.१ मिमी, कुंभार पिंपळगाव मंडळात ८६.३ मिमी, तर जांबसमर्थ मंडळात ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.