पायाने दिव्यांग असलेल्या तरुणाकडून ग्रामपंचायतचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:02+5:302021-01-14T04:26:02+5:30
बदनापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पायाने अपंगत्व असलेल्या एका तरुणाने तीनचाकी गाडीचा आधार घेत प्रचार केला. बदनापूर तालुक्यातील ...

पायाने दिव्यांग असलेल्या तरुणाकडून ग्रामपंचायतचा प्रचार
बदनापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पायाने अपंगत्व असलेल्या एका तरुणाने तीनचाकी गाडीचा आधार घेत प्रचार केला.
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील वैभव दहिवाळ (२४) या तरुणाने शेलगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक एकमधून सर्वसाधारण पुरुष या जागेकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या तरुणाचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालेले आहे. सध्या तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावतो. या तरुणाला लहानपणी अपंगत्व आल्यामुळे त्याला दोन्ही पायाने चालता येत नाही. बुधवारपर्यंत त्याने आपल्या तीनचाकी स्कूटीवरून घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. यावेळी त्याच्यासमवेत वडील, लहान भाऊ, कुटुंबातील व्यक्ती व त्याचे मित्र प्रचारात सहभागी होत होते. तो पहिल्यांदाच ही निवडणूक लढवित असून, त्याने आपल्या जाहीरनाम्यात मुलांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी स्वच्छतागृह, व्यापाऱ्यांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, साफसफाई अशा अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. याविषयी वैभव म्हणाला, माझी इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करण्याची इच्छा आहे. यासाठी मला मित्रमंडळींनी निवडणुकीत उभे राहण्यासाठी प्रेरित केले.