आजपासून ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:18+5:302020-12-23T04:27:18+5:30
या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवाराला मोठे महत्त्व असते. पॅनल उभे करून ही निवडणूक लढविली जाते. त्यामुळे पॅनलमध्ये कोण ...

आजपासून ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी
या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवाराला मोठे महत्त्व असते. पॅनल उभे करून ही निवडणूक लढविली जाते. त्यामुळे पॅनलमध्ये कोण कोण असावे, हे जवळपास आता निश्चित झाले असून, त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत असल्याने एकाच पक्षातील उमेदवार हे अन्य वेगवेगळ्या पॅनलमध्ये राहणार असल्याने याला पक्ष पातळीवर फारसे महत्त्व नसते. निवडणुकांचे निकाल लागल्यावर ज्या पॅनलमध्ये ज्या राजकीय पक्षांचे उमेदवार जास्त असतात त्या पक्षाच्या ताब्यात ती ग्रामपंचायत आली असे मानले जाते. त्यामुळे राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते या निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारात उतरत नसले तरी त्यांच्या सांगण्यावरूनच पॅनलची निश्चिती केली जात असल्याचे दिसून येते.
यंदाच्या या निवडणुका महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशाच राहणार असल्याने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रशासनाकडून जय्यत तयारी
जालना जिल्ह्यात आठ तालुक्यांसाठी तहसील तसेच काही ठिकाणी अन्यत्र उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. जाफराबाद तालुका वगळता अन्य सर्व सातही तालुक्यांत २७ निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांना मदत करण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणूनदेखील २७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
थेट निधी येणार असल्याने रंगत वाढली
पंचायत राज योजनेनुसार आता निधींचे वाटप हे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येप्रमाणे निधी विकास कामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त अयोगानुसार हा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि विशेषकरून तरुणांचा या निवडणुकीत मोठा सहभाग राहील, असे दिसून येते. या निवडणुका कोरोनाच्या काळात होणार असल्याने सर्व ती खबरदारी घेण्याचे बंधन अत्यंत कडक राहणार आहे.