हे सरकार अधर्मी -उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:21 IST2018-02-05T00:20:47+5:302018-02-05T00:21:42+5:30

केवळ जाहिरातबाजी करणा-या केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

This government is unrighteous - Uddhav Thackeray | हे सरकार अधर्मी -उद्धव ठाकरे

हे सरकार अधर्मी -उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी, (जि.जालना) : केवळ जाहिरातबाजी करणा-या केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
घनसावंगी येथे रविवारी आयोजित शेतकरी मेळावा व पक्ष कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, सचिव मिलिंद नार्वेकर, डॉ. हिकमत उडाण, विनोद घोसाळकर, लक्ष्मण वडले, शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे, ए.जे. बोराडे, भास्कर अंबेकर, जगन्नाथ काकडे, डॉ. संजय कच्छवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, की आंदोलन करणा-या शेतक-यांवर गुन्हे दाखल करता आणि लष्करावर दगडफेक करणा-यांवरील गुन्हे माफ करता? सरकारचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळाला नाही, म्हणून धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला. या सरकारला शेतक-यांचे काहीच देणे-घेणे नाही, परंतु शिवसेना कायम शेतक-यांच्या पाठीशी आहे.
पंतप्रधानांनी पतंग उडविण्यापेक्षा श्रीनगरमध्ये जावून तिरंगा फडक वावा. देशात तूर साखर उपलब्ध असताना पाकिस्तानातून कसा आयात करता, असा सवालही त्यांनी केला. पंधरा वर्षे सत्तेत राहून डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.
शिवसेना शेळी, कासव, ससा, गांडूळ झाली पण आम्ही धरणात लघुशंका करण्याची भाषा कधीच केली नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीने नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. जिल्हाप्रमुख बोराडे म्हणाले, की येत्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपेंची हिटलरशाही संपविल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.
या वेळी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य आंशीराम कंटुले, पंचायत समिती सदस्य अशोक उदावंत, संदीप कंटुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जगन्नाथ काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर उद्धव मरकड यांनी आभार मानले.
शिवसेनेची ताकद वाढल्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत घनसावंगीत भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. तीन वर्षांपासून झोपी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता शेतक-यांचा पुळका आला आहे. मात्र, शेतक-यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने सरकारवर नेहमीच हल्लाबोल केला आहे. शेतकरी मेळाव्याला हजारोंच्या संख्येने जमलेली गर्दी म्हणजे हिकमत उढाण यांच्या कामाची पावती असून, याच जोरावर विधानसभेला घनसावंगीमध्ये भगवा फडकणारच, असे त्यांनी सांगितले.

Web Title: This government is unrighteous - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.