आता घरातून काढा लर्निंग लायसन्स!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 04:02 IST2021-06-12T04:02:57+5:302021-06-12T04:02:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : केंद्र शासनाने आता आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद ...

आता घरातून काढा लर्निंग लायसन्स!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र शासनाने आता आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय सूचना केंद्राने वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केलेले आहेत. या सेवांमध्ये घरबसल्या रस्ता सुरक्षाविषयक व्हिडिओ पाहून लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी परीक्षा देता येणार आहे. यासाठी मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असावा लागणार आहे. या नवीन योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शिकाऊ उमेदवारांना फायदा होणार आहे.
कोरोना स्थितीमुळे अनेक बदल घडवून आणले आहेत. यामुळे परिवहन अधिकारी प्रशासनाकडून जास्तीत जास्त कामे ऑनलाईन करण्याकडे भर दिला जात आहे. दरम्यान, अर्जदाराला संकेतस्थळावर स्वत:चे अर्ज करताना आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येणार आहे. यामुळे अर्जदाराच्या ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आवश्यकता असणार नाही. यानंतर अर्जदार रस्ता सुरक्षाविषयक व्हिडिओची पाहणी केल्यानंतर घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देणार आहे.
नवीन वाहनाची प्रथम नोंदणी वितरकांकडूनच
नव्या वाहनाची विक्री केल्यानंतर त्या वाहनाची आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक शोरूममध्ये जाऊन तपासणी करतात. त्यानंतरच आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होते. परंतु, आता वाहनाच्या नोंदणीसाठी वाहन निरीक्षक शोरूममध्ये जाऊन तपासणी करण्याची गरज नाही. ही पध्दत या आठवड्यापर्यंत सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शिकाऊ तसेच कायमस्वरूपी परवान्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक दिवसाला विशिष्ट कोटा दिला आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहन परवान्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. आवश्यक दस्तऐवज संकेतस्थळावर अपलोड करावे लागतात. येथील कार्यालयात दररोज १०० ते १२० लायन्स दिले जात आहेत.
...तर जावे लागेल
आरटीओ कार्यालयात
ज्यांच्याकडे आधार नाही किंवा ऑनलाईन परीक्षा द्यायची नाही. अशांना आरटीओ कार्यालयात जाऊन परीक्षा देता येणार आहे. परंतु, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. लॅपटॉप, संगणकही घराघरात आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स घरी बसून काढण्याचे प्रमाण निश्चितच वाढले.
लर्निंग लायसन्सची चाचणी ऑनलाईन देऊन वाहनचालकांना स्वत: प्रिंट काढता येईल. तसेच नव्या वाहनाच्या नोंदणीसाठी शोरूममध्ये निरीक्षकांना जाण्याची गरज राहणार नाही. यासाठी काही बदल करणे सुरू आहे. अद्याप अधिक सविस्तर माहिती आलेली नाही. परंतु, पुढील आठवड्यात अथवा या आठवड्यापर्यंत हे सुरू होण्याचाी शक्यता आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
सध्या लायसन्ससाठी ज्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज कारावा लागतो. अपॉइंमेंट घ्यावी लागते. त्या संकेतस्थळावर लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करून चाचणी देता येईल.
उमेदवाराला संकेतस्थळावर आधार क्रमांक नोंद करावा लागले. नाव, पत्ता व स्वाक्षरी ही माहिती आधार डेटाबेसमधून परिवहन विभागाला मिळणार आहे. अर्जदाराला घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणी देता येईल. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन हटविण्यात आल्यानंतर सोमवारपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. आता खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत वाहन नोंदणीचे प्रमाण वाढणार आहे. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.