विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:05+5:302021-02-05T08:05:05+5:30
जालना : विविध कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येथे शासनाने सुरू केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन ...

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
जालना : विविध कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येथे शासनाने सुरू केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजनेतून कामे केली जात असून, या प्रकल्पाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.
बाष्पीभवन नियंत्रण, साठवण पुन:स्थापना आणि इतर लाभांसाठी महाराष्ट्र शासनाने माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यातील तंत्रज्ञान कामाचा बुधवारी आमदार गोरंट्याल यांच्या हस्ते घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयाजवळ शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संगीत गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पुनम स्वामी, न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे नगर अभियंता राजेश बगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिला पायलट प्रकल्प राबवण्यात येत आहे. जलाशयाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून या परिसरातील झाडे- झुडपे तोडून घेण्यात आली आहेत. असे असले तरी हा तलाव यापुढे शंभर वर्षे जिवंत राहिला पाहिजे. बाष्पीभवनामुळे तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. हे पाणी वाया न जाता तेही उपयोगात यावे म्हणून सर्वात प्रथम हा पायलट प्रकल्प राबविला जात असल्याचेही गोरंट्याल यांनी सांगितले.
साठवण क्षमता वाढीसाठी प्रयत्न
या प्रकल्पांतर्गत तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याबरोबरच साठवण क्षमता वाढविणे व इतर विकास कामे केली जाणार आहेत. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी संबंधित कंपनी कोणत्याही केमिकलचा वापर न करता नैसर्गिकरीत्या हे काम करणार आहे. या प्रकल्पामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच तलावाची साठवण क्षमता वाढण्यासदेखील मदत होणार आहे. यासाठी रवींद्र पाठक, अर्जुन पाठक, रोहित घोडे, मयुरेश्वर भानुशाम, कुणाल लिंभोरे आदी स्थापत्य अभियंते काम पाहत आहेत.
(फोटो)