friend's murder in Jalna on money laundering | जालन्यात पैशाच्या वादातून मित्राची निर्घृण हत्या
जालन्यात पैशाच्या वादातून मित्राची निर्घृण हत्या

जालना : पैश्याचे वादातून एका २८ वर्षीय युवकाचा काठीने आणि चाकुने वार करुन हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२५ ) सकाळी उघडकीस आली. कुमार शरदचंद्र झुंजूर (२८,  लक्ष्मीनारायणपुरा ) असे मृताचे नाव असून किल्ला जिनिंग परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार झुंजुरे आणि विजय तुळशीराम मुंगशे हे दोघे मित्र आहेत. विजय याने दोन महिन्यांपूर्वी कुमार याला १ लाख २० हजार रुपये दिले होते. ही रक्कम परत मागितली असता कुमारने रक्कम ठेवलेली पिशवी आपल्या भोळसर आईने जाळून टाकल्याचे सांगत रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होते. 

बुधवारी रात्री विजयने किल्ला जिनिंग परिसरात कुमारला बोलावून घेतले. दोघांनी यावेळी मद्य प्राशन केले. यानंतर त्यांच्यात परत पैशाचे वाद उफाळून आला. वादातून विजयने अचानक कुमारला काठीने मारहाण सुरु केली. बेदम मारहाण करत विजयने कुमारच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. 

आज सकाळी कुमारचा मृतदेह या भागात आढळून आला. याची हत्येची माहिती मिळताच पोलिसांना अधिक तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन तासात विजय याला ताब्यात घेतले. 


Web Title: friend's murder in Jalna on money laundering
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.