दारू पाजून मित्राने भडकावले, दारूच्या नशेत बहिणीला ठार केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:53+5:302021-02-12T04:28:53+5:30
जालना : बहिणीच्या वाट्याला जाणारी जमीन मिळण्यासाठी मित्राने दारू पाजून भडकावले. त्यानंतर मुलांना भेटण्याचा बहाणा करून बहिणीला रिक्षात बसवून ...

दारू पाजून मित्राने भडकावले, दारूच्या नशेत बहिणीला ठार केले
जालना : बहिणीच्या वाट्याला जाणारी जमीन मिळण्यासाठी मित्राने दारू पाजून भडकावले. त्यानंतर मुलांना भेटण्याचा बहाणा करून बहिणीला रिक्षात बसवून चौधरीनगर परिसरात नेले. दारूच्या नशेत दीपक पटेकर याने गळा दाबून व दगडाने मारून कमलाबाई कोल्हे यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दीपक पटेकरला भडकावणाऱ्या संशयित आरोपी संतोष ऊर्फ बाबासाहेब ढोबळे यास बुधवारी रात्री ताब्यात घेतल्याची माहिती सपोनि. संभाजी वडते यांनी दिली.
जालना शहरातील चौधरीनगर परिसरात कमलाबाई शाहूराव कोल्हे (५५, रा. खापोली, मुंबई) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी सापडला होता. कमलाबाई कोल्हे यांना तीन भाऊ व तीन बहिणी आहेत. त्यांच्या वडिलांची अंबड तालुक्यातील आपेगाव येथे दीड एकर जमीन आहे. सदरील जमीन त्यांच्या मधल्या भावाने आपल्या नावावर केली होती. हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावर दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील न्यायालयात सुनावणी होती. यासाठी कमलाबाई कोल्हे या मुंबई येथून चंदनझिरा येथील मोठ्या भावाकडे आल्या होत्या. खरपुडी येथील लहान भाऊ दीपक पटेकर हादेखील चंदनझिरा येथे आला होता. सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दीपक पटेकर व संतोष ऊर्फ बाबासाहेब ढोबळे यांनी दारू पिली. यावेळीच संतोषने दीपक पटेकरला बहिणीच्या वाट्याला येणारी जमीन तुला पाहिजे असेल, तर तुझ्या बहिणीला मारून टाक, असे सांगून भडकावले. त्यानंतर दीपकने बहीण कमलाबाई यांना फोन करून खरपुडी येथे मुलांना भेटण्याचा बहाणा करून बोलवून घेतले. तिघेही रिक्षात बसून चौधरीनगर परिसरात गेले. तेथेच कमलाबाई कोल्हे यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दीपक पटकेर याला अटक केली होती. त्याने साथीदारासह हा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री संतोष ढोबळे याला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे.
म्हणून तेथेच केला खून...
दीपक पटेकर व बाबासाहेब ढोबळे हे दोघे घरांचे बांधकाम करतात. सध्या त्यांचे काम चौधरीनगर येथे सुरू होते. त्यांना या परिसराची पाहणी केली होती. त्यांना तेथे रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याचे समजले. त्यामुळेच त्यांनी चौधरीनगर परिसरात कमलाबाई कोल्हे यांचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.